
आशिया कप 2025 स्पर्धला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 6 संघांची घोषणा करण्यात आली आहे. ओमान क्रिकेट टीमने सोमवारी 25 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. ओमानची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे या पदार्पणाच्या हंगामात ओमानची कायम लक्षात राहिली अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
ओमान क्रिकेट संघात भारतीय वंशाचे असंख्य खेळाडू आहेत. जतिंदर सिंह ओमानचं नेतृत्व करणार आहे. जतिंदर सिंह हा मुळचा भारतीय आहे. जतिंदर व्यतिरिक्त ओमान संघात 4 मुळ भारतीय आहेत. या चौघांमध्ये करण सोनावले, विनायक शुक्ला, आर्यन बिष्ट आणि आशीश ओडेडेरा यांचा समावेश आहे. आशिया कप स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ओमानचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ओमान व्यतिरिक्त ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि यजमान यूएईचा समावेश आहे. त्यामुळे ओमानसमोर तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे कॅप्टन जतिंदर आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. या निमित्ताने जतिंदर सिंह याच्या भारत ते ओमान या प्रवासाबाबत जाणून घेऊयात.
जतिंदर 36 वर्षांचा आहे. जतिंदरचा जन्म 5 मार्च 1989 साली लुधियाना इथे झाला होता. जतिंदर 14 वर्ष भारतात राहिला. त्यानंतर जतिंदर 2003 साली ओमानला स्थलांतरित झाला. जतिंदरचे वडील 1975 साली नोकरीनिमित्ताने ओमानला गेले होते. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. गुरमेल सिंह रॉयल ओमान पोलिसांसाठी सुतार म्हणून काम करायचे.
जतिंदरने ओमानला गेल्यानंतर पुढील शिक्षणही तिथेच घेतलं. जतिंदरने ज्या शाळेत शिक्षण घेतलं तिथेच क्रिकेटचे धडे गिरवले. जतिंदरच्या क्रिकेटला तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जतिंदरने काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली. त्या जोरावर जतिंदरला अंडर 19 ओमान संघात संधी मिळाली. त्यानंतर जतिंदरने राष्ट्रीय संघात धडक दिली. जतिंदरने 2015 साली ओमानसाठी टी 20 डेब्यू केला. जतिंदरने अफगाणिस्तान विरुद्ध पदार्पण केलं.
जतिंदर ओमानचं टी 20i आणि एकदिवसीय संघाचं प्रतिनिधित्व करतो. जतिंदरने आतापर्यंत एकूण 64 टी 20i सामने खेळले आहेत. जतिंदरने या दरम्यान 24.54 च्या सरासरीने 1 हजार 399 धावा केल्या आहेत. जतिंदरने या दरम्यान 8 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच जतिंदरने 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.37 च्या सरासरीने 1 हजार 704 धावा केल्या आहेत. जतिंदरने वनडे करियरमध्ये 4 शतकं आणि तितकीच अर्धशतकं ठोकली आहेत.
जतिंदर क्रिकेटसह एका कंपनीत कामही करतो. जतिंदर ओमानमधील खिमजी रामदास कंपनीत कार्यरत आहे. दरम्यान ओमान आशिया कप 2025 मोहिमेतील आपला पहिला सामना हा 12 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ओमानसमोर 15 सप्टेंबरला यूएई आणि 19 सप्टेंबरला भारताचं आव्हान असणार आहे.