
वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स 2025 स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असून यंदाचं दुसरं पर्व आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. आता साखळी फेरीची लढत संपली असून चार संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहे. यात पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संघ ठरले आहेत. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. पाकिस्तानने पाच पैकी चार सामने जिंकले आणि भारताविरूद्धचा सामना झाला नाही. त्यामुळे 9 गुण आणि नेट रनरेट +2.452 आहे. दक्षिण अफ्रिकेने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आणि 8 गुण आणि +2.595 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 5 पैकी 2 सामन्यात विजयी ठरली आणि एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे 5 गुण आणि -0.991 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ पाच पैकी फक्त एका सामन्यात विजयी ठरला आहे. तर पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिल्याने 3 गुण आणि -0.558 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे.
गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला पाकिस्तान आणि चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघात उपांत्य फेरीचा सामना होईल. हा सामना 31 जुलैला होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. भारतीय खेळाडूंनी कट्टर प्रतिस्पर्ध्यासोबत कोणत्याही स्पर्धात्मक सामन्यात भाग न घेण्याचे धोरण कायम ठेवले आहे. या स्पर्धेत हे दुसऱ्यांदा घडलं आहे. साखळी फेरीतही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. तेव्हा दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून दिला होता. पण आता बाद फेरीचा सामना असल्याने आयोजक बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा सामना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होऊ शकतो.
उपांत्य फेरीचं गणित संघ बदलून सोडवता येईल. पण अंतिम फेरीत पुन्हा हे दोन संघ आमने सामने आले तर काय? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. भारतीय संघ अंतिम फेरीतही हाच निर्णय कायम ठेवेल असं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ही ट्रॉफी विभागून दिली जाण्याची शक्यता आहे. पण हे सर्व काही उपांत्य फेरीच्या गणितावर अवलंबून असणार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत.