‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला

| Updated on: Dec 16, 2021 | 2:00 PM

"या वेळेला दुसऱ्यांकडे बोटं दाखवणं योग्य नाही. दक्षिण आफ्रिकेचा दौरा जवळ येतोय. कृपाकरुन त्याकडे लक्ष द्या" "बोर्डाचे अध्यक्ष हे बोर्डाचे अध्यक्ष असतात. पण भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही सुद्धा मोठी बाब आहे"

विराट आधी देशाचा विचार करं, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला
Virat Kohli - Ajinkya Rahane
Follow us on

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South africa tour) रवाना होण्यापूर्वी काल मुंबईत झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat kohli) जी स्फोटकं विधानं केली, ती माजी कर्णधार कपिल देव यांना पटलेली नाहीत. भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil dev) कोहलीवर नाराज आहेत. टी-20 च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोणी आपल्याला थांबवलं नाही, असं कोहलीने काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

तेव्हापासून वादाला झाली सुरुवात 

कोहलीचं हे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या दाव्याला छेद देणारं आहे. कारण सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘मी विराटला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं’ अशी माहिती दिली. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं खरं कोण बोलतय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोहलीच्य प्रेस कॉन्फरन्सनंतर बीसीसीआय आणि कोहलीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विराटला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवून त्याजागी रोहित शर्माची निवड केल्यापासून या सर्व वादाला सुरुवात झाली.

हे सर्व बोलण्याची ही योग्य वेळ नाही 

कोहलीने हे सर्व बोलण्यासाठी जी वेळ निवडली, त्याबद्दल कपिल देव यांनी नाराजी व्यक्त केली. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचा मोठा दौरा असताना, अशावेळी हे सर्व बोलणं योग्य नसल्याचं कपिल देव यांचं मत आहे. “या वेळेला दुसऱ्यांकडे बोटं दाखवणं योग्य नाही. दक्षिण आफ्रिकेचा दौरा जवळ येतोय. कृपाकरुन त्याकडे लक्ष द्या” असं कपिल देव म्हणाले. “बोर्डाचे अध्यक्ष हे बोर्डाचे अध्यक्ष असतात. पण भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही सुद्धा मोठी बाब आहे. सौरव असो किंवा विराट सार्वजनिक स्तरावर परस्परांबद्दल असं वाईट बोलणं ही चांगली गोष्ट नाही” असे कपिल देव म्हणाले.

६२ वर्षाच्या कपिल देव यांनी विराटला परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सर्वप्रथम देशाचा विचार करण्याचा सल्ला दिला. “जे चुकीचं आहे, ते उद्या समजेलच. पण दौऱ्याआधी असा वाद निर्माण करणं चांगलं नाही” असे कपिलदेव म्हणाले. भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे कपिल देव यांनी १३४ कसोटी सामन्यात ४३४ विकेट घेत, ५२४८ धावा केल्या आहेत. ते भारताला लाभलेले आतापर्यंतचे सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. संघाला गरज असताना, त्यांनी नेहमीच फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवली होती.

संबंधित बातम्या:
विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय?
कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड
India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना