Video : बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे शदमन इस्लामची बोलती बंद, सोडलेल्या बॉलवर दिली विकेट

जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजांच्या ताफ्यातील प्रमुख अस्त्र आहे. हे वारंवार सिद्ध झालं आहे. गेलेला सामना विरोधकांच्या तोंडातून काढण्याची ताकद बुमराहकडे आहे. आता त्याने शदमन इस्लामला टाकलेल्या चेंडूची सोशल मीडियावर स्तुती होत आहे.

Video : बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे शदमन इस्लामची बोलती बंद, सोडलेल्या बॉलवर दिली विकेट
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 20, 2024 | 5:55 PM

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर भारताने पकड मिळवली. पहिल्या दिवशी आर अश्विनच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 376 धावांपर्यंत मजल मारली. तर या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ गडबडला. जसप्रीत बुमराहने शदमन इस्लामची विकेट घेत पुढे रांगच लावली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला 227 धावांची मजबूत आघाडी मिळाली. या डावातील जसप्रीत बुमराहने टाकलेल्या जादूई चेंडूची आता स्तुती होत आहे. सोशल मीडियावर शदमन इस्लाम कसा बोल्ड झाला? बुमराहने कशी गोलंदाजी याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. शदमन इस्लाम वैयक्तिक 2 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. बांगलादेशच्या डावात पहिलं षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने जसप्रीत बुमराहला पाचारण केलं. बुमराहच्या पहिल्या पाच चेंडूवर शदमनन इस्लामने 2 धावा घेतल्या होत्या. पण सहाव्या चेंडूवर शदमनची विकेट गेली. जसप्रीत बुमराने शदमनची ऑफ स्टंफ उडवली.

जसप्रीत बुमराह डावखुऱ्या शदमन इस्लामला राउंड द विकेट गोलंदाजी टाकत होता. यावेळी जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. टप्पा अशा ठिकाणी पडला की उसळी घेऊन निघून जाईल असाचा अंदाज वाटत होता. त्यात दोन स्लीप असल्याने त्याला चेंडू सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे चेंडू सहज निघून जाईल या भाबड्या आशेत शदमन राहिला आणि चूक करून बसला. टप्पा पडताच चेंडू आत घुसला आणि ऑफ स्टंप उडवून गेला. शदमनला काही सेकंद काय झालं हेच कळलं नाही. बीसीसीआयने बुमराहच्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दरम्यान, भारत बांग्लादेश कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताचा डाव सकाळच्या सत्रात 376 धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 गडी गमवून 81 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडे आता 308 धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत नाबाद 12 आणि शुबमन गिल नाबाद 33 धावांवर खेळत आहेत.