नवी नवरी असो की म्हातारी बायको, भारतात इथं महिलांना एक वस्तू वापरण्यावर बंदी; वाचून धक्काच बसेल!
Jalor Panchayat : एका जात पंचायतीने महिलांच्या स्मार्टफोन वापराबद्दल एक आदेश जारी केला आहे. यामुळे महिलांचे अधिकार धोक्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात आजही जुनाट परंपरा पाळल्या जातात. अशा अनेक परंपरा आहेत, ज्यामुळे संविधानाने दिलेले महिलांचे हक्क धोक्यात आले आहेत. अशातच आता राजस्थानातील जालोर जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. येथे एका जात पंचायतीने महिलांच्या स्मार्टफोन वापराबद्दल एक आदेश जारी केला आहे. यामुळे महिलांचे अधिकार धोक्यात आले आहेत. नवविवाहित वधू असो किंवा महिला या जात पंचायतीच्या आदेशानुसार आता महिलांना इंटरनेट असलेल्या मोबाईल फोनचा वापर करता येणार नाही. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महिलांना मोबाईल वापरता येणार नाही
समोर आलेल्या माहितीनुसार, जालोर जिल्ह्यातील सुंधमाता पट्टी येथील चौधरी समुदायाच्या जात पंचायतीने महिलांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी घातली आहे. आता 15 गावांमधील महिला आणि मुली आता कॅमेरा असलेले स्मार्टफोन वापरू शकणार नाहीत. हा आदेश 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. या निर्णयात महिलांना सार्वजनिक कार्यक्रम, लग्न किंवा इतर ठिकाणी मोबाइल फोन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महिलांना शेजाऱ्यांच्या घरीही स्मार्टफोन नेता येणार नाही. जात पंचायचीच्या आदेशानुसार, या समुदायातील महिला स्मार्टफोनऐवजी फक्त कीपॅड मोबाइल फोन वापरू शकणार आहेत. ज्याद्वारे त्या फक्त फोनवर बोलू शकतात.
सध्या अनेक मुली मोबाईलच्या मदतीने अभ्यास करतात, आता अभ्यासासाठी फक्त घरीच मोबाइल वापरण्यास परवानगी असणार आहे. यावर निर्णय देताना जात पंचायचीने म्हटले की, जर मुलींना अभ्यासासाठी मोबाईल फोन आवश्यक असतील तर त्या घरात वापरू शकतात, मात्र त्यांना बाहेर मोबाईल वापरता येणार नाही. रविवारी जालोर जिल्ह्यातील गाजीपूर गावात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाईल बंदी मागील कारण काय?
महिलांच्या मोबाईल वापरावरील बंदीचा हा निर्णय चर्चेत आहे. यावर बोलताना जात पंचायतीच्या अध्यक्षांनी म्हटले की, महिलांकडे मोबाईल फोन असल्याने मुले त्यांचा जास्त वापर करतात, यामुळे त्यांच्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे महिलांच्या मोबईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. डिजिटल युगात महिलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे योग्य आहे का? जात पंचायत महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर असे निर्बंध लादू शकतात का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या 15 गावातील महिलांना मोबईल वापरता येणार नाही
जालोर जिल्ह्यातील भिनमाळमधील गाजीपुरा, पावली, कालदा, मनोजियावास, राजिकावास, दतलावास, राजपुरा, कोडी, सिद्रोडी, आल्डी, रोपसी, खानदेवल, सविधर आणि हथमी की धानी आणि खानपूर या 15 गावातील महिलांना मोबईल वापरता येणार नाही.
