बाईईईईई..! काय भारी कॅच पकडला राव, रोहित शर्माच्या झेलची सोशल मीडियावर चर्चा Watch Video

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कानपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ दिली आहे. पहिल्या सत्रात बांगलादेशचे तीन गडी बाद करण्यात यश आलं. यात कर्णधार रोहित शर्माने पकडलेल्या झेलची जोरदार चर्चा आहे.

बाईईईईई..! काय भारी कॅच पकडला राव, रोहित शर्माच्या झेलची सोशल मीडियावर चर्चा Watch Video
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 30, 2024 | 12:37 PM

भारत आणि बांग्लादेश दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ दिवस सुरु आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे 35 षटकात 107 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती होती. येथून पुढे खेळताना चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहने भारताला यश मिळवून दिलं. मुशफिकुरला टाकलेला चेंडूच त्याला कळला नाही. बॉल सोडण्याचा नादात विकेट घेऊन गेला. त्याची जागा घेण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज लिटन दास मैदानात आला. लिटन दासने खेळपट्टीवर पाय रोवण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहला दोन चौकार ठोकत आपला हेतूही दाखवून दिला. मोमिनुल हक आणि लिटन दास यांची जोडीही जमली होती. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे होते. ड्रींक ब्रेकनंतर कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजकडे चेंडू सोपवला. या षटकात भारताला बांगलादेशचा पाचवा गडी बाद करण्यात यश आलं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने लिटन दासचा जबरदस्त झेल पकडला. त्यामुळे त्याचा खेळ 13 धावांवरच संपुष्टात आला. रोहित शर्माने पकडलेला झेल पाहून लिटन दासही आवाक् झाला. खरंच असं झालं का यावर त्याचाही विश्वास बसेना. पण ते खरं होतं आणि त्याला तंबूत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

रोहित शर्माच्या या झेलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मोहम्मद सिराज आणि विराट कोहली यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हेच सांगत होते. योग्यवेळी मारलेली उडी आणि एका हाताने पकडलेला झेल खरंच खास आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच.. त्याने पकडलेल्या झेल पाहून अनेकांनी जसप्रीत बुमराहच्या एक्शनची कॉपी केल्याचं दाखवून दिलं आहे. तसे फोटो शेअर करून एक्शन दाखवली आहे.

दुसरीकडे, मोहम्मद सिराजने देखील अप्रतिम झेल पकडला आहे. आर अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने शाकीब अल हसनचा जबरदस्त झेल पकडला. त्यामुळे शाकीबचा डावा 9 धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर पुढचं गणित सोपं होणार आहे. सामना जिंकला किंवा ड्रॉ झाला तरी भारतीय संघ अव्वल स्थानी असेल यात शंका नाही. पण जर तरच्या लढाईत विजयी टक्केवारी राखणं खूपच महत्त्वाचं आहे.