IND vs LEI: सराव सामन्यात नवदीप सैनीचा भेदक मारा, फलंदाजीच भारताची मुख्य अडचण

| Updated on: Jun 25, 2022 | 5:50 PM

IND vs LEI: टीम इंडियाच्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावा व्हावा, यासाठी ही वॉर्म अप मॅच (Warm up match) आयोजित करण्यात आली आहे. आज सराव सामन्याचा तिसरा दिवस आहे.

IND vs LEI: सराव सामन्यात नवदीप सैनीचा भेदक मारा, फलंदाजीच भारताची मुख्य अडचण
mohammad siraj
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा लीसेस्टरशायर विरुद्ध (IND vs LEI) सराव सामना सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावा व्हावा, यासाठी ही वॉर्म अप मॅच (Warm up match) आयोजित करण्यात आली आहे. आज सराव सामन्याचा तिसरा दिवस आहे. काल भारताला फक्त 2 धावांची आघाडी मिळाली. भारताने पहिल्याडावात 8 बाद 246 धावा केल्या होत्या. लीसेस्टरशायरचा पहिला डाव 244 धावांवर संपुष्टात आला. लीसेस्टरशायरकडून ऋषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याने अर्धशतक झळकावलं. पंतला रवींद्र जाडेजानेच श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. पंतने त्याच्या अर्धशतकी खेळीत 14 चौकार आणि एक षटकार लगावला. लीसेस्टरशायरच्या संघातून चार भारतीय खेळाडू खेळतायत. मोहम्मद शमी प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 12 षटकात 42 धावा देत 3 विकेट घेतल्या. रवींद्र जाडेजाने सुद्धा तीन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

कोणी किती धावा केल्या?

दुसऱ्याडावातही भारताच्या फलंदाजीत विशेष अशी सुधारणा झालेली नाही. 41 षटकानंतर भारताची स्थिती 4 बाद 160 आहे. पण एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेलं नाही. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावातही श्रीकर भरतने सर्वाधिक 43 धावा केल्या आहेत. त्याला नवदीप सैनीने बुमराहकरवी झेलबाद केलं. शुभमन गिल 38 धावांवर आऊट झाला. त्याला सुद्धा सैनीनेच बाद केलं. गिलने 38 धावांच्या खेळीत आठ चौकार लगावले. हनुमा विहारी 20 आणि श्रेयस अय्यर 26 धावांवर बाद झाला. रवींद्र जाडेजाला भोपळाही फोडता आला नाही. त्याला सैनीनेच शिकार बनवलं. नवदीप सैनीने आतापर्यंत 9 षटकात 24 धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावातही अजून विकेट मिळालेली नाही.

फलंदाजी कच्चा दुवा

एकूण दोन्ही संघाचे मिळून 13 खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत. जास्तीत जास्त खेळाडूंना सामन्याचा सराव मिळावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. फलंदाजी भारताचा कमकुवत दुवा आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याला आठवड्याभरापेक्षा पण कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांना आपली कामगिरी सुधारावी लागेल.