… तर आम्ही सहज हरवू! भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा बरळला

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेत आमनेसामने येणार आहे. 14 सप्टेंबरला या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. असं असताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने कोणालाही सहज हरवू असं विधान केलं आहे. त्यामुळे या सामन्याला आणखी रंग चढला आहे.

... तर आम्ही सहज हरवू! भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा बरळला
... तर आम्ही सहज हरवू! भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा बरळला
Image Credit source: Joe Allison/Getty Images
| Updated on: Sep 13, 2025 | 5:59 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा साखळी फेरीत आमनासामना होणार हे स्पष्ट होतं. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला थेट सुपर 4 फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयाचा मानस असणार आहे. इतकंच काय तर या गटातून सुपर 4 फेरीसाठी हे दोन संघ पात्र ठरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत देखील आमनेसामने येतील यात काही शंका नाही. पण साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने भारतासह इतर संघांना आव्हान दिलं आहे. खरं तर हे वक्तव्य भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी केल्याने त्याच्या विधानाला अर्थ प्राप्त झाला आहे. पाकिस्ताने ओमानला पराभूत केल्यानंतर कर्णधार सलमान आघाने हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानने ओमानसमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ओमानचा संघ 16.4 षटकात सर्व गडी गमवून 67 धावा करू शकला.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, ‘फलंदाजीत आम्हाला अजूनही थोडे काम करायचे आहे. गोलंदाजी उत्कृष्ट होती, मी गोलंदाजी युनिटवर खूश आहे. आमच्याकडे तीन फिरकी गोलंदाज आहेत आणि ते सर्व वेगळे आहेत.आमच्याकडे 4-5 चांगले पर्याय आहेत आणि दुबई आणि अबू धाबीमध्ये खेळताना तुम्हाला ते हवे आहे. आम्ही 180 धावा करायला हव्या होत्या पण क्रिकेट असेच चालते. आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहोत, आम्ही तिरंगी मालिका जिंकली आणि येथे आरामात जिंकलो. जर आम्ही आमच्या योजना दीर्घकाळ अंमलात आणल्या तर आम्ही कोणत्याही संघाला हरवण्यास पुरेसे आहोत.’

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाचं शेवटचं वाक्य हे भारतीय संघाला उद्देशूनच होतं, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. कारण पुढचा सामना भारताशी होणार आहे. तसेच आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा भारताविरूद्धचा रेकॉर्ड सुमार आहे. त्यामुळे आधीच पाकिस्तानवर दबाव आहे. त्याचा भारतीय संघाचा फॉर्म पाहता पाकिस्तानसाठी कठीण पेपर असणार आहे. दुसरीकडे, भारताने देखील या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात युएई संघाचा धुव्वा उडवला. त्यामुळे या सामन्यात काय निकाल लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.