IND vs WI: रोहितच्या नेतृत्वाखाली भारताची मालिकेत विजयी आघाडी, प्रसिद्ध कृष्णाची जबरदस्त गोलंदाजी

| Updated on: Feb 09, 2022 | 9:35 PM

गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी अचूक फायदा उचलत वेस्ट इंडिजचा (India vs West indies) धावांनी पराभव केला.

IND vs WI: रोहितच्या नेतृत्वाखाली भारताची मालिकेत विजयी आघाडी, प्रसिद्ध कृष्णाची जबरदस्त गोलंदाजी
Rahul-surya
Follow us on

अहमदाबाद: गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी अचूक फायदा उचलत वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 44 धावांनी पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने (prasidh krishna) भेदक गोलंदाजी केली. त्याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून ब्रँडन किंग (18), डॅरने ब्रावो (1) आणि निकोलस पूरने (9) या आघाडीच्या फलंदाजांसह एकूण चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या जेसन होल्डरला अवघ्या (2) धावांवर दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. चांगली फलंदाजी करणाऱ्या अकील हुसैनला (34) धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. त्याने दोन विकेट घेतल्या. सिराज, चहल आणि दीपक हुड्डाने प्रत्येकी एक विकेट घेतला.

वेस्ट इंडिजकडून शामराह ब्रुक्सने सर्वाधिक (44) धावा केल्या. दीपक हुड्डाने ही विकेट काढली. वेस्ट इंडिजकडून सहाव्या विकेटसाठी 41 आणि सातव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. त्या व्यतिरिक्त एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही.

राहुल-सूर्यकुमारने सावरला डाव

तत्पूर्वी भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 64 आणि केएल राहुलने 49 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 24 आणि दीपक हुड्डाने 29 धावा करुन चांगली साथ दिली. भारताकडून सूर्यकुमार यादवसोबत आणि केएल राहुलमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक 90 धावांची भागादारी झाली. राहुलने 48 चेंडूत 49 धावा करताना चार चौकार आणि दोन षटकार लगावले. संघाची धावसंख्या तीन बाद 43 असताना केएल राहुल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने कुठलाही दबाव न घेता धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. त्यामुळे सूर्यकुमार यादवला सुद्धा सहज फलंदाजी करता आली. ही जोडी भारताला तारेल असे वाटत असतानाच, राहुल धावबाद झाला. सूर्यकुमार आणि राहुल मध्ये धाव घेताना गोंधळ उडाला आणि राहुल धावबाद झाला. त्याच्यामते ही धाव घेताना सूर्यकुमारने चूक केली. त्यामुळे रनआऊट झाल्यानंतर त्याने सूर्यकुमारवर आपली नाराजी व्यक्त केली.