
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया बुधवारी मालिका खिशात घालण्याचे मनसुबे घेऊन मैदानात उतरणार आहे. पहिल्यांदाच कायमस्वरुपी कर्णधार म्हणून खेळत असलेल्या रोहित शर्मासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. संघाच्या विजयासोबतच रोहितची नजर एका खास रेकॉर्डवरही असेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने षटकार ठोकला आणि यासह त्याने घरच्या मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित आणि धोनी दोघांनीही भारतीय भूमीवर आतापर्यंत 116 षटकार फटकावले आहेत.

धोनीने भारतात खेळल्या गेलेल्या 113 एकदिवसीय डावांमध्ये 116 षटकार लगावले आहेत, तर रोहितने केवळ 68 डावांमध्ये 116 षटकार लगावले आहेत. आज एक षटकार लगावल्यानंतर रोहित या बाबतीत धोनीच्या पुढे जाईल.

घरच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मायदेशात 147 षटकार ठोकले आहेत. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (130), ब्रेंडन मॅक्युलम (126) आणि इंग्लंडचा ऑईन मॉर्गन (119) यांचा क्रमांक लागतो.