T20 World Cup 2021 : भारत पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना होणार की नाही?, BCCI ने स्पष्टच सांगितलं!

| Updated on: Oct 20, 2021 | 1:09 PM

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयने एक मोठे अपडेट जारी केले आहे. आयसीसीसोबतच्या कमिंटमेंटमुळे भारत पाकिस्तानदरम्यानचा हायव्होल्टेज सामना रद्द केला जाऊ शकत नाही, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.

T20 World Cup 2021 : भारत पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना होणार की नाही?, BCCI ने स्पष्टच सांगितलं!
T20 World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान
Follow us on

मुंबई : बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु देखील झाला आहे. तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताशी होत आहे. परंतु हा सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूपच तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली. बीसीसीआयवर प्रचंड दबाव होता. मात्र अखेर कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामा होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

यावर्षी टी -20 विश्वचषकाचा भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे तसंच पाकिस्तानविरुद्ध विजयाचाही! विश्वचषकाबद्दल बोलायचे झालं तर भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम खूपच चांगला आहे. टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.

होय, सामना होणारच, बीसीसीआयने स्पष्ट सांगितलं!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयने एक मोठे अपडेट जारी केले आहे. आयसीसीसोबतच्या कमिंटमेंटमुळे भारत पाकिस्तानदरम्यानचा हायव्होल्टेज सामना रद्द केला जाऊ शकत नाही, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. राजीव शुक्ला एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘आम्ही जम्मू -काश्मीरमधील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा प्रश्न आहे, आयसीसीसोबतच्या कमिंटमेंटमुळे आम्ही खेळण्यास नकार देऊ शकत नाही.

एकमेकांविरुद्ध खेळावेच लागेल

राजीव शुक्ला म्हणाले, ‘तुम्हाला आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांच्याविरुद्ध खेळावेच लागेल.’ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी 20 विश्वचषक सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातूनच विराट कोहलीची फौज टी -20 विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांपासून ते टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंपर्यंत सगळेच जण उत्साही आहेत.

भारत पाकिस्तान आमने सामने

भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी असून दोघांनी सराव सामन्यात तगडा विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा :

T20 World Cup 2021 पाकिस्तानचा संघ सज्ज, भारताविरुद्ध सामन्यात तब्बल 7 गोलंदाज, काय आहे नेमकी रणनीती?

T20 World Cup च्या सराव सामन्यात भारताचा विजय, पण संघ व्यवस्थापनाच्या डोकेदुखीत वाढ, कसे निवडणार अंतिम 11?

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा