
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका भारताने 2-1 ने गमावली आहे. आता भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर आहेत. रिपोर्टनुसार, भारताचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणं कठीण आहे. नितीश कुमार रेड्डीला दुसऱ्या वनडे सामन्यात पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात खेळला नव्हता. आता पहिल्या टी20 सामन्यात खेळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. कॅनबरामध्ये भारतीय संघाने फक्त एक तासच सराव करता आला. कारण पावसामुळे सराव शिबिर आटोपतं घ्यावं लागलं. या सराव शिबिरात नितीश कुमार रेड्डी पूर्णपणे फिट नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी दावा केला आहे की, पहिल्या सामन्यात नितीशचं खेळणं कठीण आहे.
नितीश कुमार रेड्डी पहिल्या सामन्यात खेळेल की नाही नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. पण जमेची बाजू अशी आहे की, नितीश कुमार रेड्डी फिट नसला तरी शिवम दुबे फिट अँड फाईन आहेत. आशिया कप स्पर्धेत शिवम दुबेने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारताचा टी20 क्रिकेट संघ मजबूत स्थितीत आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, शुबमन गिलसारखे फलंदाज आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने यांच्यात आतापर्यंत 32 टी20 सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 20 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने फक्त 11 सामन्यात विजय मिळवला आहे. एक टी20 सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळे टी20 फॉर्मेटमध्ये भारताची बाजू भक्कम असल्याचं दिसत आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं वाटतं तितकं सोपं नाही. ऑस्ट्रेलियातही आक्रमक खेळी करणारे खेळाडू आहेत. ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, टिम डेव्हिड, जोश इंग्लिससह मार्कस स्टोयनिस संघात आहेत. तर गोलंदाजीत हेझलवूड, नाथन एलिस, कुहनॅमन यांची ताकद आहे.