CSK vs KKR | रिंकू सिंह- नितीश राणाची अर्धशतकी खेळी, कोलकाताचा चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

| Updated on: May 14, 2023 | 11:39 PM

कोलकाता नाईट रायडर्स टीमने चेन्नई सुपर किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरच्या या विजयाने चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफ क्वालिफायची डोकेदुखी वाढली आहे.

CSK vs KKR | रिंकू सिंह- नितीश राणाची अर्धशतकी खेळी, कोलकाताचा चेन्नईवर 6 विकेट्सने विजय
Follow us on

तामिळनाडू | कोलकाता नाईट रायडर्स टीमने चेन्नई सुपर किंग्स संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. ककेआरने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 9 बॉल राखून पूर्ण केलं. कॅप्टन नितीश राणा आणि रिंकू सिंह हे जोडी या विजयाची शिल्पकार ठरली. केकेआरचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर चेन्नईला आता प्लेऑफ क्वालिफाय करण्यासाठी आपल्या पुढच्या दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे.

केकेआरची 145 धावांचं पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. केकेआरचे रहमानुल्लाह गुरुबाज, वेंकटेश अय्यर आणि जेसन रॉय हे झटपट आऊट झाले. त्यामुळे केकेआरची 4.3 ओव्हरमध्ये 3 बाद 33 अशी नाजूक स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन नितीश राणा आणि रिंकू सिंह या जोडीने चौथ्या विकेटसाठी 99 धावांची निर्णायक भागीदारी केली. या दरम्यान रिंकूने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर रिंकून 54 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आंद्रे रसेल मैदानात आला. पण तोवर सर्व काही संपल्यात जमा होतं. रिंकू आणि नितीश या जोडीने केकेआरला विजयी केलं.

नितीशने नाबाद 57 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. तर रसेलने नाबाद 2 रन्स केल्या. चेन्नईकडून दीपक चाहर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर त्या व्यतिरिक्त एकालाही विकेट घेता आली नाही.

चेन्नई सुपर किंग्सची बॅटिंग

दरम्यान त्याआधी चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला. चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे याने केलेल्या 48 धावांच्या खेळीमुळे केकेआरला 145 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं. दुबेने 34 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने या 48 धावा केल्या. दुबेशिवाय डेव्हॉन कॉनवे याने 30, रविंद्र जडेजा याने 20, ऋतुराज गायकवाड याने 17, अजिंक्य रहाणे याने 16 धावांचं योगदान दिलं. तर अंबाती रायुडू आणि मोईन अली या दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या.

केकेआरकडून सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्थी या फिरकी जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा या दोघांनीही 1-1 विकेट घेतली.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.