
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आज शुक्रवारी 12 मे रोजी 5 वेळा विजेता असलेली मुंबई इंडियन्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा एकमेकांसमोर येण्याची ही या हंगामातील दुसरी वेळ आहे. याआधी गुजरातने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून गेल्या पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न पलटणचा असणार आहे. विशेष म्हणजे ही लढत टीम विरुद्ध टीम तसेच कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी आहे. टीम इंडियासाठी एकत्र खेळणारे 2 दिग्गज या सामन्यानिमित्ताने एकमेकांसमोर आहेत. मुंबईचं कर्णधारपद हे रोहित शर्मा याच्याकडे आहे. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे.
प्लेऑफच्या दिशेने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. गुजरातला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. त्यामुळे मुंबईला पराभूत करुन प्लेऑफ प्रवेश निश्चित करण्याचा मानस गुजरात टायटन्सचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला विजयात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. अशातच मुंबईला झटका देणारी बातमी समोर आली आहे.
राजस्थान रॉयल्स टीमने 11 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. राजस्थानने 150 धावांचं आव्हान हे 1 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 41 बॉल राखून पूर्ण केलं. त्याचा राजस्थानला नेट रन रेटमध्ये मोठा फायदा झाला. तर याचाच फटका मुंबईला बसला. राजस्थानचे या विजयासह 12 पॉइंट्स झाले. तर मुंबईचेही तेवढेच आहेत. मात्र राजस्थानचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे राजस्थान मुंबईला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहचली. तर मुंबईची चौथ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे मुंबईला हा मोठा झटका आहे.
दरम्यान आता मुंबईचा गुजरातला पराभूत करून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव ही जोडी विस्फोटक खेळी करत आहेत. त्यामुळे या जोडीकडून गुजरात विरुद्धच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. जर या सामन्यात मुंबईचा पराभव झाला, तर प्लेऑफचं समीकरण किचकट होऊ शकतं.
गुजरात टायटन्स टीमचं आयपीएलमध्ये 2022 हे पहिलं वर्ष होतं. गुजरातने या आपल्या पहिल्याच सिजनमध्ये धमाका केला. गुजरातने या पदार्पणातील हंगामात ट्रॉफी जिंकली. दरम्यान मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण 2 वेळा आमनसामना झाला आहे. यामध्ये मुंबईने आणि गुजरातने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे ही आकडयांची लढाई ही बरोबरीची आहे. मुंबईची गोलंदाजी हा पलटणचा कमीपणाची बाजू आहे. तर गुजरातचे गोलंदाज आणि फलंदाज सातत्याने चमदार कामगिरी करतायेत. त्यामुळे कागदावर बरोबरीत असलेल्या दोन्ही टीमपैकी शुक्रवारी कोण मैदान मारेल, हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.