PBKS vs RR | देवदत्त आणि जयस्वालचं अर्धशतक, राजस्थान ‘यशस्वी’, पंजाबवर 4 विकेट्सने विजय

राजस्थान रॉयल्स टीमने पंजाब किंग्स टीमचा घरच्या मैदानात 4 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेर राजस्थानने बाजी मारली आहे.

PBKS vs RR | देवदत्त आणि जयस्वालचं अर्धशतक, राजस्थान यशस्वी, पंजाबवर 4 विकेट्सने विजय
| Updated on: May 20, 2023 | 12:31 AM

धर्मशाळा | राजस्थान रॉयल्स टीमने पंजाब किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. पजांब किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 2 बॉल राखून आणि 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कल याने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल 50 धावा करुन आऊट झाला. शिमरॉन हेटमायर याने 46 धावांची निर्णायक खेळी केली.

रियान परागने 20 धावांचं योगदान दिलं. तर जॉस बटलर याला भोपळा फोडण्यात अपयश आलं. कॅप्टन संजू सॅमसन 2 धावा करुन बाद झाला. जॉस बटलरला भोपळाही फोडता आला नाही. ध्रुव जुरेल आणि ट्रेन्ट बोल्ट या जोडीने राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या ध्रु्वने नाबाद 10 आणि ट्रेन्ट नॉट आऊट 1 रन केला. पंजाबकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस आणि राहुल चाहर या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पंजाबची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. सॅम करन आणि शाहरुख खान या जोडीने केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सला 180 पार मजल मारता आली. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबची फारशी चांगली सुरुवात राहिली नाही. प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, कॅप्टन शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन आऊट झाल्याने पंजाबची 6.3 ओव्हरमध्ये 4 बाद 50 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर जितेश शर्मा, सॅम करन आणि शाहरुख खान या तिकडीने तडाखेदार खेळी केली.

सॅम करन आणि जितेश शर्मा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 64 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर जितेशला नवदीप सैनीने आऊट केलं. जितेशने 28 बॉलमध्ये 3 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेल्या शाहरुखने सॅम करनला चांगली साथ दिली या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 38 बॉलमध्ये नाबाद 73 धावांची भागीदारी केली. या दरम्यान शाहरुख आणि सॅम या दोघांनी दे दणादण बॅटिंग केली.

पंजाबसाठी सॅम करन याने 31 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स ठोकत सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. तर शाहरुखने 23 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह नॉट आऊट 41 रन्स केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सला पॉइंट्स टेबलमध्ये पछाडलं

राजस्थानने या विजयासह मुंबई इंडियन्सला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकलं आहे. राजस्थानने पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.राजस्थानचा नेट रनेकेट हा प्लसमध्ये असल्याने हा फायदा झाला आहे. तर मुंबई मायन्समध्ये असल्याने सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

राजस्थानला आरसीबीपेक्षा नेट रनरेट दमदार करण्यासाठी 188 धावांचं आव्हान हे 18.3 पूर्ण करायचं होतं. मात्र राजस्थानला ते शक्य झालं नाही. पण यानंतरही राजस्थानच्या प्लेऑफमधील जर तरच्या आशा या कायम आहेत. पण राजस्थानला स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन) प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, एडम झॅम्पा, ट्रेन्ट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.