IPL 2023 Playoffs Race : 2 दिवस, 4 सामने… 6 संघ अजूनही IPLच्या प्लेऑफच्या स्पर्धेत; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

| Updated on: May 20, 2023 | 10:41 AM

आयपीएलचा यंदाचा सीजन अत्यंत रोमांचकारी झाला आहे. आयपीएलमध्ये येत्या दोन दिवसात चार सामने होणार आहेत. त्यात सहा संघ खेळणार आहेत. हे संघ नुसते खेळणार नाहीत. तर प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून हे संघ खेळणार आहेत.

IPL 2023 Playoffs Race : 2 दिवस, 4 सामने... 6 संघ अजूनही IPLच्या प्लेऑफच्या स्पर्धेत; जाणून घ्या संपूर्ण समीकरण
IPL 2023 Playoffs Scenarios
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा दणदणीत पराभव केला. धर्मशाला येथे पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने राजस्थानला 188 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट राजस्थानने शेवटच्या षटकात पार पाडलं. राजस्थान रॉयल्सच्या विजयामुळे पंजाबचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पंजाबच्या पराभवामुळे प्लेऑफचं गणितही बिघडून गेलं आहे.

पंजाब किंग्सपूर्वी सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा मावळली होती. अजूनही आयपीएलमध्ये चार सामने व्हायचे बाकी आहेत. आतापर्यंत गुजरा टायटन्सने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर इतर सहा संघ अजूनही प्लेऑफच्या स्पर्धेत आहेत.

हे सुद्धा वाचा

चेन्नई सुपर किंग्स : चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या मोसमातील 13 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई सध्या 15 पॉइंट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी धोनी ब्रिगेडच्या या संघाला आज दिल्ली कॅपिटल्सला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. आजचा सामना गमावल्यास मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पैकी कोणता तरी एक संघ पराभूत व्हावा म्हणून चेन्नईला देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. किंवा कोलकाताने लखनऊ संघाला मोठ्या फरकाने हरवल्यास चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग मोकळा होणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स : कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपला शेवटचा सामना जिंकावा लागेल. लखनऊच्या संघाचा शेवटचा सामना आजच आहे. त्यांची भिडत कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. आजचा सामना गमवावा लागल्यास मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी पराभूत व्हावेत म्हणून लखनऊला देव पाण्यात ठेवावे लागतील. कारण या दोन्ही संघापैकी एक संघ पराभूत झाल्यास लखनऊला प्लेऑफचे दरवाजे उघडतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आरसीबीलाही प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. उद्या रविवारी 21 मे रोजी आरसीबीची लढत गुजरातशी आहे. उद्याचा सामना आरसीबी हारल्यास त्यांना मुंबई, लखनऊ किंवा चेन्नई या तीन संघापैकी एखादा संघ पराभूत होण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, उद्या गुजरातविरोधात पराभूत होतानाही मोठ्या फरकाने पराभव होणार नाही याची काळजी आरसीबीला घ्यावी लागणार आहे. नाही तर रन रेटमध्ये आरसीबीचा प्लेऑफचा दावा संपुष्टात येईल. कारण आरसीबीपेक्षा राजस्थानचा रन रेट चांगला आहे.

राजस्थान रॉयल्स : राजस्थान रॉयल्स अंकतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये जाईल अशी कोणतीच शक्यता नाही. केवळ नशीब बलवत्तर असेल तरच राजस्थानला प्लेऑफमध्ये संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि आरीसीबीने आपले शेवटचे सामने गमावले, कोलकाता संघ लखनऊकडून पराभूत झाल्यास आणि कोलकाता आणि लखनऊच्या विजयातील अंतर 103 धावांचं असल्यावरच राजस्थानला प्लेऑफमध्ये संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. त्याशिवाय आरसीबी, सीएसके किंवा लखनऊ या पैकी एखादा संघ पराभूत होण्याची प्रार्थानाही करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्स आपला शेवटचा सामना हारल्यास मुंबईचा प्लेऑफचा दावा संपुष्टात येणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : कोलकाता नाइट रायडर्सला लखनऊला कमीत कमी 103 धावांनी पराभूत करावं लागणार आहे. तसेच मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागणार आहे. तसं झालं नाही तर कोलकाताला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागणार आहे.

कुणाचा कुणासोबत मुकाबला?

20 मे- 15.30- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
20 मे- 19.30- कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता
21 मे- 15.30- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, मुंबई
21 मे- 19.30- रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध गुजरात टाइटन्स, बंगळुरू