
आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफचं गणित आज काही अंशी सुटेल असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सने सामना गमवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचं गणित आणखी एका सामन्याने लांबलं आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली असती तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुलाही फायदा झाला असता. मात्र चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने काही संघांचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं आहे. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. प्लेऑफमध्ये फारसं काही करता आलं नाही. त्यामुळे पुढचं धावांचं गणित फिस्कटलं. कोणत्याच फलंदाजाला आक्रमक अशी फटकेबाजी करता आली नाही. रियान परागने त्यातल्या त्यात 35 चेंडूत 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 141 धावा केल्या आणि विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्सने 18.2 षटकात 5 गडी गमवून 142 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सने दिलेलं आव्हान खूपच कमी असल्याने रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून दिली. रचिन रवींद्रने 18 चेंडूत 27 धावा केल्या. यात एक चौकार आणि 2 षटकार मारले. डेरील मिचेलने 13 चेंडूत 22 धावा केल्या आणि बाद झाला. तर शिवम दुबे 11 चेंडूत 18 धााव करून आर अश्विनच्या जाळ्यात अडकला.एका बाजूने कर्णधार ऋतुराज गायकवाड कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. तग धरून सामना हातात पकडून ठेवला. रवींद्र जडेजा ऑब्स्ट्रक्टिंग ऑफ द फिल्डचा शिकार ठरला. त्याने 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 41 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्याला समीर रिझवीची साथ मिळाली. त्याने 8 चेंडूत नाबाद 15 धावांची खेळी केली.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल