IPL Eliminator, RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं राजस्थानसमोर सोपं आव्हान, कोण जिंकणार?

आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानने बाजूने लागला. राजस्थानने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. आता 120 चेंडूत बंगळुरुने दिलेल्या 173 धावा गाठायच्या आहेत.

IPL Eliminator, RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं राजस्थानसमोर सोपं आव्हान, कोण जिंकणार?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2024 | 9:25 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत क्वॉलिफायर 2 फेरीसाठी महत्त्वपूर्व सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघ क्वॉलिफायर 2 फेरीत सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राजस्थानने आरसीबीला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान राजस्थान रॉयल्स 120 चेंडूत पूर्ण करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. सामन्याचं महत्त्व ओळखून विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी सावध सुरुवात केली. पण संघाच्या 37 धावा असताना फाफ डु प्लेसिस उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेल देऊन बसला. त्याने 14 चेंडूत 17 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर हा खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न विराट कोहली आणि कॅमरून ग्रीन जोडीने केला. पण युझवेंद्र चहलच्या जाळ्यात विराट कोहली अडकला. षटकार मारताना हवी तशी ताकद मिळाली नाही. सीमेवर उभा असेल्या डोनोवन फेरेराच्या हाती झेल देत बाद झाला. त्याने 24 चेंडूत 33 धावा केल्या. यात तीन चौकार आणि 1 षटकार मारला.

कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धावांची गती वाढवण्यासाठी मधेमधे एक दोन उत्तुंग षटकारही मारले. पण विकेट सांभाळून ठेवणं कठीण झालं. कॅमरून ग्रीन 21 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेल काही खास करू शकला नाही. पुन्हा एकदा त्याने आरसीबीच्या चाहत्यांची निराशा केली. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. रजत पाटीदारकडून अपेक्षा होत्या मात्र त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. 22 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.दिनेश कार्तिक 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. महिपाल लोमरोरने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण 17 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. शेवटच्या चेंडूवर काही धावा येतील असं वाटत होतं. मात्र कर्ण शर्मा संदीप शर्माला विकेट देऊन बसला. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने 3, आर अश्विनने 2, ट्रेंट बोल्टने 1, संदीप शर्माने 1 आणि युझवेंद्र चहलने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.