IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही हार्दिक पांड्याला बसला फटका, सामन्यातील ‘ती’ चूक भोवली

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची छाप अजूनही हवी तशी पडलेली नाही. 7 पैकी 3 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना हातून निसटता निसटता वाचला. असं असताना या सामन्यातील एक चूक हार्दिक पांड्याला भोवली आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर थेट कारवाई केली आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही हार्दिक पांड्याला बसला फटका, सामन्यातील ती चूक भोवली
| Updated on: Apr 19, 2024 | 5:07 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघ साखळी फेरीत साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पंजाब किंग्स विरुद्ध पकड मिळवलेला सामना गमवण्याची वेळ आली होती. एक क्षण असं वाटत होतं की पंजाब हा सामना आरामात जिंकेल. पंजाब विरुद्धच्या सामन्यात गोलंदाज पुरते हैराण दिसत होते. जसप्रीत बुमराह सोडला तर शेवटी गोलंदाजीसाठी कोणाला वापरायचं हा प्रश्न पडला होता.पण नशिबाने ऐनवेळी साथ दिली आणि आशुतोष शर्मा बाद झाला. आशुतोष शर्मा बाद झाल्याने सामना मुंबईच्या पारड्यात झुकला आणि शेवटी विजय मिळवला. सामना संपल्यानंतर विजय हा विजय असतो असं सांगायला हार्दिक पांड्या विसरला नाही. पण आता हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलला आहे. ठरलेल्या वेळेत षटकं पूर्ण न केल्याने हा दणका दिला आहे. हार्दिक पांड्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून 12 लाखांचा दंड ठोठावला आहे.20 षटक टाकण्यासाठी बीसीसीआयने वेळ निश्चित करून दिली आहे.

मुंबई इंडियन्स संघ ठरलेल्या वेळेपेक्षा दोन षटकं मागे होता. यामुळे 19वं आणि 20वं षटक टाकताना एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्डच्या आत ठेवणं भाग पडलं. मात्र असं होऊनही मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पराभूत केलं आणि सामना 9 धावांनी जिंकला. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पहिल्यांदाच असा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब किंग्सविरुद्ध संथ गतीने गोलंदाजी केल्याचा आरोप बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात केला आहे. पण अशी चूक पुन्हा घडल्यास मुंबई इंडियन्स अडचणीत येऊ शकते.

दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सने ही चूक केली कर्णधार हार्दिक पांड्याला 12 लाखाऐवजी 24 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच इतर खेळाडूंनाही दंड भरावा लागेल. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर 24 लाखांचा दंड लागला आहे. तिसऱ्यांदा अशी चूक केली तर त्याला दंड आणि एका सामन्याची बंदी असेल. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, कोलकाता नाईट रायझर्स कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 192 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 53 चेंडूत 78 धावा केल्या. तर रोहित शर्माने 36 धावांचं योगदान दिलं. शेवटी तिलक वर्मानेही 34 धावा करत धावांमध्ये भर घातली. पंजाब किंग्सचा संघ 19.1 षटकात सर्वबाद 183 धावा करू शकला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला.