
आयपीएलच्या 18 व्या मोसमात गुरुवारी 17 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात पहिली यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र मुंबईला यंदाच्या मोसमात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. मात्र मुंबईने गेल्या सामन्यात सलग 4 सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सचा विजय रथ रोखत दुसरा विजय मिळवला. त्यानंतर आता मुंबईसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? हे जाणून घेऊयात.
मुंबईसाठी रियान रिकेल्टन आणि रोहित शर्मा हे दोघे ओपनिंग करु शकतात. रोहितला या मोसमात आतापर्यंत सूर गवसलेला नाही. रोहितला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तर रियान रिकेल्टन याला एका खेळीचा अपवाद वगळता काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे या जोडीकडून मुंबईला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.
विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव या जोडीवर मिडल ऑर्डरचा डोलारा असेल. सूर्याला आतापर्यंत त्याच्याकडून अपेक्षित असलेली खेळी करता आलेली नाहीत. तसेच तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि नमन धीर या त्रिकुटावरही पलटणची मदार असणार आहे. तिलकने दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात 59 धावांची खेळी केली. तसेच सूर्यानेही दिल्लीविरुद्ध 28 बॉलमध्ये 40 रन्स केल्या होत्या. त्यामुळे सूर्या आणि तिलकला सूर गवसला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र त्यांना सातत्याने अशी खेळी करावी लागेल, तेव्हाच मुंबई आपलं आव्हान कायम ठेवू शकेल.
कर्ण शर्मा आणि मिचेल सँटनर या जोडीवर फिरकी बॉलिंगची जबाबदारी असू शकते. कर्णने गेल्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर मिचेल सँटनर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच जसप्रीत बुमराह, दीपक चाहर आणि ट्रेन्ट बोल्ट या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा , रियान रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स , सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर , मिचेल सँटनर, दीपक चाहर , ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कर्ण शर्मा (इमपॅक्ट प्लेअर)