MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय, वानखेडेत लखनौचा 54 धावांनी धुव्वा, पराभवाची परतफेड

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Match Result : हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत आयपीएल 2025 मधील सहाव्या विजयाची नोंद केली आहे.

MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय, वानखेडेत लखनौचा 54 धावांनी धुव्वा, पराभवाची परतफेड
Jasprit Bumrah and Hardik Pandya Mumbai Indians Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2025 | 7:55 PM

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सवर 54 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर लखनौने गुडघे टेकले. मुंबईने लखनौला 20 ओव्हरमध्ये 161 रन्सवर ऑलआऊट केलं. मुंबईने यासह हा सामना जिंकला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण सहावा तर सलग पाचवा विजय ठरला. मुंबईने यासह लखनौच्या पराभवाची परतफेड सुद्धा केली. लखनौने मुंबईला 4 एप्रिलला पराभूत केलं होतं. पलटणने या पराभवाचा हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला.

लखनौच्या मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर या 4 विस्फोटक फलंदाजांना विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी वेळ असतानाच या घातक फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या चौघांव्यतिरिक्त लखनौकडून एकाही फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी काही करण्याआधीच रोखलं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

लखनौची बॅटिंग

लखनौसाठी आयुष बदोनी याने सर्वाधिक धावा केल्या. बदोनीने 35 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्श 34 धावा करुन आऊट झाला. निकोलस पूरन याने 27 रन्स केल्या. तर डेव्हिड मिलर 24 धावांवर बाद झाला. रवी बिश्नोई याने 2 षटकारांसह 13 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही फंलदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विल जॅक्स याने 2 विकेट्स घेत लखनौचं कंबरडं मोडलं. तर कॉर्बिन बॉश याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

मुंबईची बॅटिंग

दरम्यान त्याआधी लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. मुंबईसाठी रायन रिकेल्टन आणि सूर्यकमार यादव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रायनने 58 तर सूर्याने 54 धावा केल्या. तर विल जॅक्स 29, नमन धीर 25*, कॉर्बिन बॉश 20 आणि रोहित शर्मा याने 12 धावांचं योगदान दिलं. या चौघांच्या निर्णायक योगदानाच्या जोरावर मुंबईने 200 पार मजल मारली. तर लखनौकडून मयंक यादव आणि आवेश खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई, दिग्वेश राठी आणि प्रिंस यादवने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

लखनौचा वानखेडेत अचूक कार्यक्रम

लखनौचा हिशोब बरोबर

दरम्यान मुंबईने विजयासह लखनौचा हिशोब क्लिअर केला आहे. लखनौने 4 एप्रिलला एकाना स्टेडियममध्ये मुंबईवर 12 धावांनी मात केली होती. त्यानंतर आता मुंबईने लखनौवर विजय मिळवत पराभवाचा हिशोब बरोबर केला आहे.