RCB vs PBKS : आम्ही लढाई हरलो आहोत, पण…; पराभवानंतर श्रेयस अय्यरने थेट सांगितलं

आयपीएल 2025 क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा मानहानीकारक पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सला फक्त 101 धावा करता आल्या. या धावा आरसीबीने 2 गडी गमवून पूर्ण केल्या. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने आपलं म्हणणं मांडलं आहे.

RCB vs PBKS : आम्ही लढाई हरलो आहोत, पण...; पराभवानंतर श्रेयस अय्यरने थेट सांगितलं
श्रेयस अय्यर
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 10:48 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सकडून थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हिसकावून घेतली आहे. पंजाब किंग्सने नाणेफेक गमावल्यानंतर बरंच काही गमवत गेले. खरं तर या सामन्यात पंजाब किंग्सचा कुठेच वरचष्मा दिसला नाही. पहिल्या षटकापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुने पंजाब किंग्सला बॅकफूटवर ढकललं. पंजाब किंग्सला वर येण्याची संधी दिली नाही. त्यामुळे प्रत्येक चेंडूनंतर पंजाब किंग्सचा पराभव स्पष्ट दिसत होता. झालंही तसंच आरसीबीने पंजाब किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. पंजाब किंग्सचा खेळ 14.1 षटकातच आटोपला. पंजाब किंग्सला 14.1 षटकात सर्व गडी गमवून 101 धावा केल्या. तसेच विजयासाठी 102 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयानंतर पंजाब किंग्सचं थेट अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण अजून एक संधी पंजाब किंग्सकडे आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स यांच्यापैकी एका संघाशी लढावं लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘विसरण्यासारखा दिवस नाही, पण ड्रॉइंग बोर्डवर परत जायला लागेल. आम्ही पहिल्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. मागे जाऊन अभ्यास करण्यासारखे बरेच काही आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, नियोजनाच्या बाबतीत आम्ही जे काही केले, मैदानाबाहेर आम्ही जे काही केले, ते मला वाटते की ते योग्य होते. फक्त मैदानावर आम्ही ते अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजांनाही दोष देऊ शकत नाही, कारण बचाव करण्यासाठी हा एक कमी धावसंख्या होती. आम्हाला आमच्या फलंदाजीवर विशेषतः या विकेटवर काम करावे लागले.’

‘आम्ही येथे खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये काही बदलत्या उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या होत्या. आम्ही अशी कारणे देऊ शकत नाही कारण दिवसाच्या शेवटी आम्ही व्यावसायिक आहोत आणि आम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते आणि आम्हाला ती पूर्ण करावी लागते. आम्ही लढाई हरलो आहोत, पण युद्ध नाही.’, असं सांगत श्रेयस अय्यरने क्वॉलिफायर 2 फेरीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. आता पंजाब किंग्स अंतिम फेरी गाठणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.