IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाचा वचपा काढला, पंजाब किंग्सला 7 विकेट्सने केलं पराभूत

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा वचपा काढला. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. बंगळुरूने 3 गडी गमवून विजयी धावांचं आव्हान गाठलं.

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाचा वचपा काढला, पंजाब किंग्सला 7 विकेट्सने केलं पराभूत
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 6:50 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाब किंग्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी फिलीप सॉल्ट आणि विराट कोहली मैदानात उतरली होती. पण पहिल्याच षटकात फिलीप सॉल्टच्या रुपाने धक्का बसला. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल 35 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारले आणि 61 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीने सावध पण सावरणारी खेळी केली. त्याने 43 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. पण धावांचा पाठलाग करता असताना कर्णधार रजत पाटीदार 13 चेंडूत 12 धावा करून तंबूत परतला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पांड्या, सुयश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांनी चांगली गोलंदाजी केली. कृणाल पांड्याने 4 षटकात 25 धावा देत दोन गडी बाद केले. सुयश शर्माने 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. तर रोमारियो शेफर्डने 2 षटकं टाकली आणि 18 धावा देत 1 गडी टिपला. पंजाब किंग्सकडून प्रभसिमर सिंगने 33 आणि शशांक सिंगने नाबाद 31 धावांची खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पंजाब किंग्सची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. गुणतालिकेत आता पाच संघाचे 10 गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी चुरसीची होणार आहे. या स्पर्धेत अजूनही सर्वच संघांना प्लेऑफची संधी आहे. कोणता संघ आता टॉप 4 मध्ये स्थान मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेत समोरासमोर आले होते. पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे 14 षटकांचा खेळ झाला होता. तेव्हा आरसीबीने 14 षटकात 9 गडी गमवून 95 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं होतं. तर पंजाबने हे आव्हान 12.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं होते.