Video : वेळ संपल्यावर रोहित शर्माने घेतला डीआरएस? पंचगिरीवरून पुन्हा एकदा वाद

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केलं आहे. सलग सहा सामने जिंकून अव्वल स्थान गाठलं आहे. राजस्थान रॉयल्सला 100 धावांनी पराभूत करून नेट रनरेटही सुधारला आहे. आता एका विजयासह प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माच्या रिव्ह्यूची चर्चा होत आहे.

Video : वेळ संपल्यावर रोहित शर्माने घेतला डीआरएस? पंचगिरीवरून पुन्हा एकदा वाद
रोहित शर्मा
Image Credit source: video grab
| Updated on: May 02, 2025 | 3:16 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 50व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात रोहित शर्माने 36 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. पण रोहित शर्मा 7 धावांवर असताना तंबूत गेला होता. फझलक फारुकी राजस्थान रॉयल्सकडून दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या चैथ्या चेंडूवर रोहित शर्माने चौकार मारला. पण पाचव्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि जोरदार अपीलनंतर पंचांनी त्याला पायचीत घोषित केलं. पण डीआरएस घेताना रोहित शर्मा आणि रिकल्टन यांच्यात चर्चा सुरु होती. रोहित शर्माने डीआरएस घेण्यासाठी थोडा वेळ घेतला. सोशल मीडियानुसार, रोहितने 15 सेकंदांनंतर डीआरएस घेतला. रोहितने रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांना आढळले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला होता. त्यामुळे रोहित शर्माला जीवदान मिळालं.

जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावले. त्याने रिक्टनसोबत 116 धावांची भागीदारी केली. पण वेळ संपूनही डीआरएस दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित डीआरएस घेणार नाही असे वाटत होते. पण, टायमर शून्यावर पोहोचताच त्याने डीआरएससाठी अपील केलं आणि ते मान्य केल्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने वेळ संपल्यानंतर डीआरएस घेतल्याची चर्चा अनेक सोशल मीडियावर करत आहेत. पण व्हायरल व्हिडीओत परफेक्ट शून्यावर त्याने डीआरएस घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे काय खरं काय खोटं हे सांगणं कठीण आहे.

डीआरएस नियमांनुसार, खेळाडूंना 15 सेकंदांच्या आत डीआरएसचा निर्णय घ्यावा लागतो. रोहित शर्माने डीआरएस कसा घेतला याबद्दल लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काही जण म्हणत आहेत की त्याने वेळेवर डीआरएस घेतला नाही. त्याच वेळी, काही जण म्हणत आहेत की पंचांचा निर्णय चुकीचा होता. या घटनेमुळे आयपीएलमधील डीआरएस नियमांवरील वाद पुन्हा सुरू झाला आहे.