IPL 2025 चं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? अंतिम सामना कुठे? 2 संघांना धक्का!
Indian Premier League 2025 Schedule : क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर किती दिवसांनी आयपीएलच्या 'रन'संग्रामाला सुरुवात होईल? जाणून घ्या.

क्रिकेट चाहत्यांना सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ आपल्या देशाला चॅम्पियन करण्यासाठी आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हेच एकमेकांविरुद्ध खेळणारे खेळाडू आयपीएलनिमित्ताने एकत्र खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दुबईत 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. त्यानंतर आता आयपीएलच्या या आगामी हंगामाच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हंगामाला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हंगामाचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? अंतिम सामना कुठे होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे.
स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडून येत्या आठवड्याभरात आयपीएवलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं या स्पर्धेचं वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जातं? याकडे लक्ष असणार आहे.
अंतिम सामना कुठे?
रिपोर्ट्सनुसार, या 18 व्या मोसमातील अंतिम सामना हा कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच प्लेऑफमधील पहिले 2 सामने हे राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहेत.
दिल्ली आणि राजस्थानला झटका!
रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या पहिल्या मोसमातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांना प्रत्येकी 2 सामने घरच्या मैदानाऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागणार आहेत. राजस्थान एकूण सामन्यांपैकी 5 सामने हे घरच्या मैदानात खेळेल. तर उर्वरित 2 सामने कुठे होणार हे निश्चित नसल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच दिल्लीला 2 सामने घरच्या मैदानाऐवजी वायझॅगमधील एसीए-वीडीसीए स्टेडियममध्ये खेळायचे आहेत. दिल्लीने गेल्या हंगामातही काही सामने हे वायझॅगमध्ये खेळले होते.
मेगा ऑक्शनमध्ये 639.15 कोटी खर्च
दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दुबईत 24 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी 2 दिवसीय मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेगा ऑक्शनमधून एकूण 10 फ्रँचायजींनी 182 खेळाडूंना बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं होत. 10 फ्रँचायजींनी एकूण 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च केले. तर 375 खेळाडू हे अनसोल्ड ठरले.
