IPL 2025 : केकेआरच्या पराभवानंतर शाहरूख खानचं मन दुखावलं, म्हणाला की…

आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या 4 धावांनी पराभव झाला. गतविजेत्या कोलकाता संघाला यावेळी हवी तशी लय सापडत नसल्याचं दिसत आहे. असं असताना संघ मालक शाहरूख खानने टीमला एक संदेश पाठवला आहे.

IPL 2025 : केकेआरच्या पराभवानंतर शाहरूख खानचं मन दुखावलं, म्हणाला की...
शाहरूख खान
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2025 | 10:08 PM

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी यंदाचं वर्ष काही खास दिसत नाही. कारण विजयाची लय कायम ठेवण्यात हवं तसं यश मिळत नाही. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स पाच सामने खेळली असून त्यात दोन सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. खासकरून लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी पराभव झाला. विजयाच्या वेशीवर असताना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवानंतर संघ मालक शाहरूख खानचं मन दुखावलं आहे. त्याने संघाचं मनोबल वाढवण्यासाठी एक संदेश पाठवला आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव झाल्यानंतर शाहरूख खानने पाठवलेली चिठ्ठी ड्रेसिंग रुममध्ये वाचली गेली. ही चिठ्ठी केकेआर संघाचे मॅनेजर वेंकटेश मैसूर यांनी वाचून दाखवली. यात हिम्मत हारू नका आणि पराभवातून शिका असं सांगितलं आहे. शाहरूख खानने पाठवलेल्या संदेशात असं लिहिलं आहे की, ‘हा एक दुखद पराभव आहे. कारण आपण खूपच जवळ होतो. पण या सामन्यात आपल्याला अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या. आपण लढू शकतो आणि मोठा स्कोअर करू शकतो. कधी कधी आपलं सर्वोत्तमही पुरेसं नसतं. आज तसाच दिवस होता.’

शाहरूख खानने पुढे खेळाडूंना आठवण करून दिली की, ‘आपण फक्त एक बॉल, एक हिट दूर होतो.’या पराभवाला मागे टाकून आता पुढे जाण्याची गरज आहे, असंही शाहरूख खानने पुढे सांगितलं. त्याने संदेशात पुढे लिहिलं की, ‘समंजसपणे पाहिल्यास, मला वाटते की अशा प्रकारचे हृदयद्रावक दु:ख संघाला जवळ आणते.’ कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी दिलेलं 238 धावांचं लक्ष जवळपास गाठलं होतं. अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर मैदानात असताना हा विजय सोपाही वाटत होता. पण टप्प्याटप्प्याने विकेट पडल्या आणि विजय लांबला.

शेवटी फिनिशर म्हणून उतरलेल्या रिंकु सिंहकडून फार अपेक्षा होत्या. त्याने तुफान फटकेबाजी केली. पण 19 षटकात दोन चेंडू निर्धाव गेले आणि विजय आणखी लांब गेला. त्यात शेवटच्या चेंडूवर चौकार आल्याने हार्षित राणाला स्ट्राईक आली. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून दिली. पण चार चेंडूत उर्वरित लक्ष्य गाठणं काही शक्य झालं नाही. विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. आता कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना 11 एप्रिल चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. हा चेपॉक मैदानावर होणार आहे.