IPL 2026 Orange Cap : पहिल्या फेरीनंतर सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?
IPL 2026 Orange Cap : आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील पहिल्या फेरीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे. या तिघांपैकी 1 अनकॅप्ड तर 2 कॅप्ड खेळाडू आहेत.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची जबरदस्त अशी सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिली फेरी पूर्ण झाली आहे. प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. या हंगामातील 10 पैकी 5 संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरले. तर 5 संघांना अपेक्षित अर्थात विजयी सुरुवात करण्यात अपयश आलं. राजस्थान रॉयल्स, गतविजेता रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिट्ल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या 5 संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर सीएसके, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबादला आपल्या मोहिमेतील पहिला सामना गमवावा लागला.
पहिल्या फेरीनंतर ऑरेंज कॅपसाठीही जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्य फेरीनंतर आपण सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. या यादीत पहिल्या 5 फलंदाजांमध्ये मुंबई इंडियन्सच्या दोघांचा समावेश आहे. तर हैदराबाद, दिल्ली आणि पंजाबच्या एका फलंदाजाचा समावेश आहे.
मुंबईचा फलंदाज पहिल्या स्थानी
पहिल्या फेरीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत मुंबईचा ओपनर रायन रिकेल्टन विराजमान आहे. रायनने सलामीच्या सामन्यात केकेआर विरुद्ध अप्रतिम अर्धशतकी खेळी केली होती. रायनने केकेआर विरुद्ध 81 धावांची फायर खेळी केली होती. रायनने या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार लगावत मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.
इशान किशन दुसऱ्या स्थानी
सनरायजर्स हैदराबादचा हंगामी कर्णधार इशान किशन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रायन आणि इशान या दोघांमध्ये फक्त 1 धावेचाच फरक आहे. इशान त्याच्या नेतृत्वात हैदराबादला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र इशान फलंदाज म्हणून सरस ठरला. इशानने आरसीबी विरुद्ध 38 बॉलमध्ये 8 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 80 रन्स केल्या होत्या.
हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी
मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. रोहित केकेआर विरुद्ध 6 सिक्स आणि 6 फोरसह एकूण 78 रन्स केल्या होत्या.
समीर विराटला पछाडत टॉप 5 मध्ये
पंजाब किंग्सचा कूपर कोनोली चौथ्या तर दिल्ली कॅपिट्ल्सचा अनकॅप्ड फलंदाज समीर रिझवी पाचव्या स्थानी आहे. कूपरने सलामीच्या सामन्यात नाबाद 72 धावा केल्या. तर समीरने 1 एप्रिलला लखनौ विरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नाबाद 70 धावा केल्या. समीरने यासह विराट कोहली याला मागे टाकत थेट टॉप 5 मध्ये धडक दिली. समीर आणि विराट या दोघांमध्ये पहिल्या सामन्यानंतर फक्त 1 धावेचा फरक आहे. विराटने या हंगामात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध नाबाद 69 धावा केल्या होत्या.