IPL 2026 : आंद्रे रसेल आयपीएलमधून निवृत्त, ऑलराउंडरचा तडकाफडकी मोठा निर्णय
IPL 2026 Retirement : कोलकाता नाईट रायडर्सला 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या आंद्रे रसेल याने 16 व्या मोसमाआधी आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमासाठी 27 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन पार पडलं. त्यानतंर आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शन होणार आहे. मात्र त्याआधीच कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी ऑलराउंडर आंद्रे रसेल याने मोठा निर्णय घेतला आहे. आंद्रे रसेल याने आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आंद्रे रसेल याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत निवृत्त होत असल्याचं सांगितलंय. मात्र रसेल निवृत्तीनंतरही केकेआरच्या ड्रेसिंग रुमचा भाग असणार आहे. केकेआर फ्रँचायजीने आंद्रे रसेल याला काही दिवसांपूर्वीच करारमुक्त केलं होतं. त्यामुळे आंद्रे मिनी ऑक्शनमध्ये उतरणार अशी चर्चा होती. त्यामुळे आंद्रेला ऑक्शनमध्ये किती भाव मिळणार? याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र त्याआधीच आंद्रेने आयपीएलला रामराम केला आहे. आता आंद्रे केकेआरच्या कोचिंग स्टाफचा भाग असणार आहे.
रसेलकडून 14 वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीचा शेवट
रसेलने 2012 साली दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. रसेलने 2 वर्ष दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर रसेल 2014 साली केकेआर टीममध्ये दाखल झाला. तेव्हापासून रसेल केकेआरकडून खेळत होता.
रसेलने आयपीएल कारकीर्दीत एकूण 140 सामने खेळले आहेत. रसेलने 115 डावांमध्ये 174.17 च्या स्ट्राईक रेटने आणि 28.20 च्या सरासरीने एकूण 2 हजार 651 धावा केल्या आहेत. तसेच रसेलने बॉलिंगनेही कमाल केली आहे. रसेलने 121 डावांमध्ये 123 विकेट्स घेतल्या. तसेच रसेलने गेल्या हंगामात 10 डावांत 167 धावा केल्या होत्या. तसेच 8 विकेट्सही मिळवल्या होत्या.
रसेलची सोशल मीडिया पोस्ट
रसेलने इंस्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. “मी आयपीएलमधून निवृत्त होत आहे. आयपीएलमधील प्रवास शानदार राहिला. 12 हंगामांची आठवण आणि केकेआर कुटुंबियांकडून मिळालेलं खूप सारं प्रेम. मी आताही जगभरातील इतर लीग स्पर्धेत खेळत राहणार आहे. तसेच मी केकेआरची साथ सोडत नाहीय. तुम्ही मला केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये पाहाल”, असं रसेलने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
केकेआरने 2012 व्यतिरिक्त 2014 आणि 2024 साली आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. रसेल 2014 आणि 2024 या आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता. आंद्रे रसेल याने या दोन्ही हंगामात केकेआरला आयपीएल चॅम्पियन करण्यासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलं होतं. रसेल आताही केकेआरसोबत असणार आहे. मात्र आता रसेल केकेआरला मैदानाबाहेरून जिंकवण्यासाठी मदत करताना दिसणार आहे.
