IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?

IPL 2026 Points Table After 36th Match : इशान किशन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 132 धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीमुळे हैदराबादला एकतर्फी विजय मिळवता आला. हैदराबादला यासह पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.

IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
Abhishek Sharma and Ishan Kishan RR vs SRH
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 26, 2026 | 5:08 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिलला 2 सामने खेळवण्यात आले. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 35 व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. पंजाब किंग्सने दिल्ली विरुद्ध स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वीरित्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. पंजाबने 265 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. पंजाबने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. पंजाबचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. पंजाबने अशाप्रकारे आपली विजयी घोडदौड कायम राखली. पंजाब स्पर्धेच्या इतिहासात 7 सामन्यानंतर अजिंक्य राहणारी पहिलीच टीम ठरली.

तर डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 36 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर मात करत सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवला आहे. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात यशस्वीरित्या चौथ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत 2 गुणांची कमाई केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 229 धावांचं आव्हान हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

हैदराबादचा विजयी पंच

हैदराबादचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर राजस्थान विरुद्धचा दुसरा विजय ठरला. याआधी हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात 13 एप्रिलला आमनासामना झाला होता. तेव्हा हैदराबादने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे राजस्थानकडे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र हैदराबादने तसं होऊ दिलं नाही. राजस्थानचा हा या मोसमातील एकूण तिसरा पराभव ठरला. या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

पंजाब अव्वल स्थानी कायम

पंजाबने दिल्लीवर मात करत पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम ठेवलाय. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये 7 सामन्यानंतर 13 गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. गतविजेता आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. सनरायजर्स हैदराबादने राजस्थान पराभूत करुन पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 3 मध्ये धडक दिली आहे. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. हैदराबाद चौथ्यावरुन तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

हैदराबादचं जोरदार कमबॅक

पंजाब, बंगळुरु, हैदराबाद आणि राजस्थान या 4 संघांच्या खात्यातील गुण दुहेरी अंकात आहेत. या 4 संघांनी किमान 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठी यांच्यात चुरस आहे.

चेन्नई, दिल्लीत आणि गुजरात टफ फाईट

चेन्नई, दिल्ली आणि गुजरात या 3 संघांच्या खात्यात 7 सामन्यानंतर 8 गुण आहेत. या तिन्ही संघांनी 4 सामने जिंकलेत तर 3 सामने गमावले आहेत. मात्र नेट रनरेटमुळे चेन्नई पाचव्या, दिल्ली सहाव्या आणि गुजरात सातव्या स्थानी आहे. त्यानंतर मुंबई आठव्या आणि लखनौ नवव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी 7 पैकी फक्त 2 सामने जिंकलेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. केकेआरने 7 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. केकेआरचा 5 सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर पंजाब विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला होता . त्यामुळे केकेआरच्या खात्यात सर्वात कमी अर्थात 3 गुण आहेत.

Follow Us