CSK : चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही, सलग 3 पराभवानंतर अश्विन सीएसकेबाबत स्पष्टच म्हणाला

R Ashwin On Chennai Super kings : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सलग आणि एकूण 3 सामने गमावणारी पहिली टीम ठरली. सीएसकेच्या या पराभवानंतर माजी फिरकीपटू आर अश्विन याने आपल्या माजी संघाच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली.

CSK : चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही, सलग 3 पराभवानंतर अश्विन सीएसकेबाबत स्पष्टच म्हणाला
Chennai Super Kings and R Ashwin
Image Credit source: Bcci and PTI
| Updated on: Apr 06, 2026 | 6:41 PM

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) वाट लागलीय. एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स टीमला 19 व्या हंगामात विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. सीएसेकेने या मोहिमेतील आपला तिसरा सामना रविवारी 5 एप्रिलला आरसीबी विरुद्ध खेळला. आरसीबीने सीएसकेवर एकतर्फी फरकाने मात करत सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकला. तर सीएसकेचा हा सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. कर्णधार ऋतुराज गायकवाड या मोसमात आतापर्यंत सपशेल अपयशी ठरला आहे. चेन्नईच्या या कामगिरीवरुन माजी फिरकीपटू आर अश्विन याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अश्विनने सीएसकेमधील वातावरणाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच अश्विनने बोलता बोलता अप्रत्यक्षपणे या वातावरणामुळेच आपण निवृत्ती घेतल्याचं म्हटलं. अश्विनने नक्की काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

अश्विनने सीएसकेसाठी शेवटचा हंगाम खेळून आयपीएलला अलविदा केला. अश्विन आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम यशस्वी फिरकीपटूपैकी एक होता. “मी सीएसकेसोबत एका निराशाजनक हंगाम घालवला आहे. मी आणखी खेळू शकलो असतो. मात्र माझ्यात इतर गोष्टी पेलण्याची भावनिक ताकद नसल्याने मी हा निर्णय घेतला”, असं अश्विन त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला.

आर अश्विन याने निवृत्तीचा निर्णय काय घेतला?

“मला टीममध्ये ठेवावं की नाही? हे ठरवताना टीम मॅनेजमेंटला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही, त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेतला. तसेच माझ्या निवृत्तीमुळे त्यांचे 10 कोटी रुपयांची बचतही झाली”, असंही अश्विनने नमूद केलं.

फिरकीपटूचं सीएसकेच्या वातावरणाबाबत भाष्य

“चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण फार तणावग्रस्त असेल याबाबत मला खात्री आहे. आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतर चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये फार निराशेचं वातावरण असेल”, असंही अश्विनने म्हटलं.

“चेन्नईच्या आरसीबी विरूद्धच्या पराभवाचं मी शब्दात वर्णन करु शकत नाही. आरसीबी-सीएसके स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय सामन्यापैकी एक आहे”, असं म्हणून अश्विनने या सामन्याचं महत्त्व नमूद केलं.

आर अश्विन काय म्हणाला?

“सीएसके टीममध्ये फार उणीवा आहेत. सीएसके टीममध्ये नवखे खेळाडू आहेत. सीएसकेमधील खेळाडूंना फार कमी अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवता येणार नाही”, असं अश्विनने म्हटलं.

Follow Us