
आयपीएल स्पर्धेतील 39 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला धोबीपछाड दिला. स्पर्धेत दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे, या सामन्यात एकूण दोन शतकं आली. चेन्नई सुपर किंग्सकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकार मारले. तर लखनौ सुपर जायंट्सकडून मार्कस स्टोयनिसने 63 चेंडूत नाबाद 124 धावांची खेळी केली. यात 13 चौकार आणि 6 षटकार मारले. आयपीएल 2024 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 9 शतकं झळकावली गेली आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे. ऑरेंज कॅप अजूनही विराट कोहलीच्या डोक्यावर आहे. मात्र येत्या काही दिवसात ही कॅप डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली 379 धावांसह अव्वल स्थानी आहे. त्याने 8 सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर 379 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आला आहे. त्याने 8 सामन्यात 1 शतक आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर 349 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड आहे. त्याने 6 सामन्यात 324 धावा केल्या आहेत. त्यानेही 1 शतक आणि दोन अर्धशतक झळकावली आहेत. राजस्थान रॉयल्सचा रियान पराग चौथ्या, तर कर्णधार संजू सॅमसन पाचव्या स्थानावर आहे. रियाने 8 सामन्यात 318, तर संजू सॅमसनने 314 धावा केल्या आहेत.
टॉप 5 मधून रोहित शर्मा बाद झाला आहे. शिबम दुबने वादळी अर्धशतकी खेळी करत त्याला मागे टाकलं आहे. 311 धावांसह शिवम दुबे सहाव्या स्थानी आहे. तर रोहित शर्मा 303 धावांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे रोहित शर्माला टॉप 5 मधील आपलं स्थान घट्ट करण्यासाठी मोठी खेळी करावी लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.