
डब्लिन | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 23 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया तिसरा सामना जिंकून आयर्लंडला क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंड मोठा उलटफेर करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. टीम इंडियाने मालिका जिंकल्याने तिसऱ्या मॅचमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. त्यानुसार विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर त्याच्या जागी अमरावतीकर जितेश शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.
तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन जसप्रीत बुमराह प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. बुमराह पहिल्या 2 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती दिली जाऊ शकते. तर संजू सॅमसन याची जागा विकेटकीपर जितेश शर्मा घेऊ शकतो. तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आवेश खान यांनाही संधी दिली जाऊ शकते.
टीम इंडियाने आतापर्यंत मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात झक्कास कामगिरी केलीय. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने धारदार बॉलिंगने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं. मात्र सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना डकवर्थ लुईसनुसार 2 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला. पहिल्या सामन्यात पावसामुळे सलामी जोडीशिवाय एकालाही संधी मिळाली नव्हती. मात्र त्याची भरपाई टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात केली.
दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने अर्धशतक ठोकलं होतं. तर शिवम दुबे आणि रिंकू सिंह या जोडीने जोरदार फटकेबाजी करत फिनिशिंग टच दिला. पहिल्यांदाच बॅटिंग करणाऱ्या रिंकूने 21 बॉलमध्ये 38 धावा केल्या. तर कॅप्टन जसप्रीत बुमराह याने बॉलिंग करताना 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई यानेही आपली छाप सोडली.
आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग इलेव्हन | यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि रवि बिश्नोई.