
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. पाचव्या कसोटीचा चौथ्याच दिवशी निकाल लागणार होता. मात्र प्रसिधक कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने धारदार बॉलिंगच्या जोरावर भारताला कमबॅक करुन दिलं.त्यामुळे सामना पाचव्या दिवशी गेला. इंग्लंडला 374 धावांचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी 35 धावांची गरज होती. तर भारताला 4 विकेट्स हव्या होत्या. टीम इंडियाने या 35 धावांचा यशस्वी बचाव करत इंग्लंडला गुंडाळलं आणि मालिकेत बरोबरी केली.
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावरुन शुबमनसेनेचं अभिनंदन करण्यात आलं. अनेक आजी-माजी खेळाडूंनी
समाजमाध्यमांवर भारताच्या या सनसनाटी विजयाबाबत भावना व्यक्त केल्या. भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये या विजयाचा जल्लोष होता. मात्र दुसऱ्या बाजूला माजी वेगवान गोलंदाजाने केलेल्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. इरफान पठाण याने केलेल्या एक्स पोस्टमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. इरफानच्या या पोस्टचा रोख विराट कोहली याच्याकडे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इरफान पठाण याने ओव्हलमधील विजयानंतर भारतीय संघाचं कौतुक केलं. तसेच भारताच्या विजयात योगदान देणाऱ्या खेळाडूंना त्याचं श्रेय दिलं. मात्र इरफानने केलेल्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. “या मालिकेने पुन्हा एकदा सर्वांना आठवण करुन दिली की क्रिकेट कुणासाठीही थांबत नाही”, असं इरफानने एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
इरफानने या एक्स पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र इरफानचा रोख हा विराट कोहली याच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने इंग्लंड दौऱ्याच्या काही दिवसांआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात भारताला या जोडीची उणीव जाणवेल, अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. मात्र तसं काहीच झालं नाही.
युवा खेळाडूंनी पाचव्या सामन्यात ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या जोडीशिवाय विजय मिळवून दाखवला आणि इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखलं. त्यानंतर इरफानने अशी पोस्ट केली. टीम इंडिया विराटशिवायही जिंकू शकते, असं इरफानला त्याच्या पोस्टमधून अधोरेखित करायचं आहे, असंही म्हटलं जात आहे.