Video: टीम इंडियात 2 वर्षांनी सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशनने व्यक्त केल्या भावना, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी घोषणा झालेल्या संघात इशान किशनचं नाव आहे. त्याच्या नावामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. या निवडीनंतर इशान किशन व्यक्त झाला आहे.

Video: टीम इंडियात 2 वर्षांनी सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशनने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...
Video: टीम इंडियात 2 वर्षांनी सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशनने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 20, 2025 | 7:45 PM

इशान किशन 2023 या वर्षी दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आला आणि त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला कलाटणी मिळाली. टीम इंडियात पदार्पणासाठी त्याला जवळपास दोन वर्षे वाट पाहावी लागली. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरच संघाची दारं खुली होतील असा समजही देण्यात आला. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीशिवाय त्याला टीम इंडियात पदार्पण करणं काही शक्य नव्हतं. त्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेली दोन वर्षे तो घाम गाळत होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने आक्रमक खेळी केली. इतकंच काय त्याच्या नेतृत्वात झारखंडने पहिल्यांदा जेतेपदावर नावही कोरलं. त्याचं फळ त्याला टीम इंडियात स्थान मिळून मिळालं आहे. टीम इंडियात पदार्पण झाल्यानंतर इशान किशनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने पुनरागमन झाल्यानंतर आनंद व्यक्त केला, पण दिलखुलास बोलणं मात्र टाळलं.

टीम इंडियातील सिलेक्शनवर इशान किशन काय म्हणाला?

मुंबईत टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर मिडिया इशान किशनचा शोध घेऊ लागली. पटनामध्ये त्याच्या घरी मिडिया पोहोचली. तेव्हा त्याने मीडियाला निराश केलं नाही. त्याने प्रतिक्रिया दिली, पण फार काही बोलला नाही. मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इशान किशन इतकंच म्हणाला की, ‘मला कळलं आणि मी खूप आनंदी आहे. मी खूश आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली होती.’ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत इशान किशनने 500हून अधिक धावा केल्या. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिला.

इशान किशनने आतापर्यंत 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 25.67 च्या सरासरीने आणि 124.37 च्या स्ट्राईक रेटने 796 धावा केल्या आहेत. यात त्याने सहा अर्धशतकं ठोकली आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 216 सामने खेळले आहेत. यात सहा शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण 5787 धावा केल्या आहे. दरम्यान, इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही हे सांगणं आता कठीण आहे. कारण संजू सॅमसन विकेटकीपर बॅट्समन आहे. अशा स्थितीत फक्त त्याला काही दुखापत झाली किंवा त्याचा फॉर्म नसेल तरच इशानला संधी मिळू शकते. त्यामुळे प्लेइंग 11 ची उत्सुकता आतापासूनच लागून आहे.