Jasprit Bumrah या मालिकेत खेळणार;चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंडियाला फायदा!
Jasprit Bumrah Team India : जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीचा त्रास जाणवला. बुमराहला या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागू शकतं, असं म्हटलं जात आहे. मात्र त्याआधी होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहला संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. बीसीसीआय शनिवारी 18 जानेवारीला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. निवड समितीची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र या खेळाडूंची नावं शनिवारी पत्रकार परिषदेतून जाहीर केली जाणार आहेत. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत असल्याने स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत अनिश्चिचतता आहे. मात्र बुमराहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत समावेश केला जाणार आहे. बुमराहच्या फिटनेसबाबत जाणून घेण्यासाठी निवड समिती हा डाव टाकणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजमध्ये उभयसंघात 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. निवड समितीने फक्त टी 20i सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे.
निवड समिती चॅम्पियन्स ट्रॉफीसह या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहे. बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवायचं, असा मानस निवड समितीचा आहे. मात्र त्याआधी बुमराहला वनडे सीरिजमध्ये स्थान देण्यात येणार आहे. बुमराह वनडे सीरिजमध्ये खेळला तर तो किती सक्षम आहे? याचा अंदाज येईल, अशी रणनिती बीसीसीआयची असल्याचं म्हटलं जात आहे.
बुमराहला दुखापत
दरम्यान जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. सिडनीत पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात आला होता. बुमराहला या सामन्यादरम्यान पाठीचा त्रास जाणवला होता. बुमराहला त्यामुळे दुसऱ्या डावात बॉलिंगही करता आली नाही. बुमराह आता या दुखापतीतून बऱ्यापैकी रिकव्हर झाला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी फिट असावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे.
