KKR vs SRH : कॅप्टन पॅट कमिन्सला लाजीरवाणा पराभव जिव्हारी, फलंदाजांवर खापर फोडत म्हणाला…

KKR vs SRH Pat Cummins : कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात राक्षसी बॅटिंग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादाचा 80 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने फलंदाजांवर खापर फोडलं.

KKR vs SRH : कॅप्टन पॅट कमिन्सला लाजीरवाणा पराभव जिव्हारी, फलंदाजांवर खापर फोडत म्हणाला...
Pat Cummins Srh Captain Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 04, 2025 | 12:21 AM

सनरायजर्स हैदराबादने आयपीलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 286 धावा करुन इतर संघांमध्ये दहशत निर्माण केली होती. मात्र त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. सहजासहजी 250 पार पोहचणारी हैदराबाद टीम कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 150 धावांपर्यंतही पोहचू शकली नाही. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 120 धावांवर ढेर केलं आणि धमाकेदार विजय मिळवला. हैदराबादचा हा सलग तिसरा आणि लाजिरवाणा पराभव ठरला. कर्णधार पॅट कमिन्स याला हा पराभव फार जिव्हारी लागला. पॅटने या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं.

पॅट कमिन्स काय म्हणाला?

“ही रात्र आमच्यासाठी चांगली नाही. मध्यात आम्ही विजयी आव्हानापर्यंत पोहचू असं वाटत होतं. ही चांगली खेळीपट्टी होती. मात्र आम्ही सुरुवातीपासूनच विजयापासून फार दूर राहिलो. सलग 3 सामने गमावल्यानंतर आमचं फार नुकसान झालं आहे. आमच्या फलंदाजांनी 2 आठवड्यांआधी 280 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, असं वाटलं होतं. मात्र आता टीममध्ये पर्याय म्हणून दुसऱ्यांना संधी देण्याबाबत विचार करावा लागेल”, असंही पॅटने म्हटलं.

सामन्याचा धावता आढावा

कोलकातासाठी वेंकटेश अय्यर आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. वेंकटेशने 60 तर अंगकृषने 50 धावा केल्या. अजिंक्य रहाणे याने 38 रन्स केल्या. तर रिंकू सिंह याने अखेरच्या क्षणी 17 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. केकेआरने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 200 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात 201 धावांचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादकडून हेन्रिक क्लासेन या व्यतिरिक्त एकालाही 30 पार मजल मारता आली नाही. क्लासेनने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना केकेआरच्या गोलंदाजांनी 16.4 ओव्हरमध्ये 120 धावांवर गुंडाळलं आणि 18 व्या मोसमात घरच्या मैदानातील पहिला आणि एकूण दुसरा विजय मिळवला.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंडू मेंडिस, सिमरजीत सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि जीशान अन्सारी.