ENG vs IND : टीम इंडियाचा खेळाडू प्लेइंग ईलेव्हनमधून आऊट? हेडिंग्लेमधून मोठी अपडेट

Team India Playing Eleven For 1st Test : इंग्लंड टीमने एका बाजूला पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. मात्र अजूनही टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू ठरले नाहीत.

ENG vs IND : टीम इंडियाचा खेळाडू प्लेइंग ईलेव्हनमधून आऊट? हेडिंग्लेमधून मोठी अपडेट
Washington Sundar Kuldeep Yadav and Ravindra Jadeja
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Jun 19, 2025 | 4:25 PM

हेडिंग्लेमध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. इंग्लंडने या पहिल्या सामन्यासाठी 18 जून रोजी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत रणशिंग फुकलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार? कुणाला संधी मिळणार? याबाबत अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऑलराउंडर रवींद्र जडेजा हा एकमेव स्पिनर असू शकतो. त्यामुळे कुलदीप यादव याला बाहेर बसावं लागणार का? असा त्याचा दुसरा अर्थ होतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधील 2 स्थानांसाठी अजूनही तिढा कायम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी कोण खेळणार? हा मोठा प्रश्न होता. मात्र उपकर्णधार ऋषभ पंत याने याबाबत 18 जून रोजी माहिती दिली. “शुबमन गिल चौथ्या आणि मी पाचव्या क्रमांकावर खेळणार”,असं पंतने म्हटलं. मात्र त्यानंतरही तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? तसेच कुलदीप यादव याला खेळवायचं का? हे 2 प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आवासून आहेत.

RevSportz नुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा हा एकमेव स्पिनर असू शकतो. तसेच कुलदीप यादव याला संधीसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते.

नेट्स प्रॅक्टीसमध्ये वेगवान गोलंदाजीवर भर

हेडिंग्लेमध्ये सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाजीवर भर देण्यात आला. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकुट सातत्याने बॉलिंग करत होते. बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याच्या मार्गदर्शनात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार सराव केला. तसेच रिपोर्ट्सनुसार, शार्दूल ठाकुर आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांपैकी कोणत्या एकाला घ्यायचं? याबाबत टीम मॅनेजमेंट विचारात आहे.

कुलदीप यादव याची कामगिरी

कुलदीप यादव याने आतापर्यंत टीम इंडियाचं 13 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कुलदीपने 56 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कुलदीपने 2018 साली इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला होता. कुलदीपला त्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. तसेच कुलदीपने इंग्लंड विरुद्ध 6 कसोटींमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान टीम इंडियाने 2002 साली लीड्समध्ये विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 स्पिनर होते. तेव्हा अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह ही फिरकी जोडी प्लेइंग ईलेव्हनमध्ये होती. या फिरकी जोडीने एकूण 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता कॅप्टन शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर फिरकी जोडी खेळवण्याबाबत काय निर्णय घेतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.