हरभजनने श्रीसंतच्या कानशि‍लात मारली त्याचा व्हिडीओ 18 वर्षानंतर समोर, ललित मोदीने सांगितलं खरं काय ते

आयपीएल 2008 स्पर्धेत हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. हरभजनने एस श्रीसंतच्या कानशि‍लात लगावली होती. पण तेव्हा फक्त श्रीसंत रडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. नेमकं काय झालं ते कोणालाच कळलं नव्हतं. आता ललित मोदीने 18 वर्षानंतर त्या घटनेचा व्हिडीओ समोर आणला आहे.

हरभजनने श्रीसंतच्या कानशि‍लात मारली त्याचा व्हिडीओ 18 वर्षानंतर समोर, ललित मोदीने सांगितलं खरं काय ते
हरभजनने श्रीसंतच्या कानशि‍लात मारली त्याचा व्हिडीओ 18 वर्षानंतर समोर, ललित मोदीने सांगितलं खरं काय ते
Image Credit source: PTI/videoScreenshot
Updated on: Aug 29, 2025 | 4:07 PM

आयपीएल स्पर्धेचा जगभरात डंका वाजत असून सर्वात श्रीमंत लीग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. पण या स्पर्धेत अनेक वादही झाले. त्यातला सर्वात चर्चित किस्सा म्हणजे हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली मारला तो प्रसंग… आजही त्या घटनेची चर्चा होत असते. श्रीसंतचा रडतानाचा व्हिडीओ समोर येतो. आयपीएलच्या पहिल्या पर्वात म्हणजेच 2008 मध्ये हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडल्यानंतर हरभजनने रागाच्या भरात श्रीसंतच्या कानशि‍लात मारली होती. त्या घटनेने मैदानात उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकवर्ग हैराण झाला होता. या प्रकरणानंतर हरभजन सिंगला आयपीएल पर्वात बंदी घातली होती. तसेच पाच वनडे सामन्यांचे निर्बंध लादले होते. हरभजन सिंगला अजूनही या गोष्टीचा पश्चाताप आहे. पण त्यानंतर ही घटना कधीच समोर आली नव्हती. त्यामुळे नेमकं काय झालं होतं हे अनेकांना कळलंच नाही. पण आता आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे.

हरभजन सिंगने श्रीसंत कशी कानशि‍लात मारली होती?

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ललित मोदीसोबत एक पॉडकास्ट केलं. ललित मोदी यांनी बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये हरभजन सिंग आणि श्रीसंत वादाबाबत नेमकं काय झालं ते सांगितलं. ललित मोदीने सांगितलं की, ‘सामना संपला होता. इतकंच काय तर कॅमेरे देखील बंद होते. पण माझा सिक्युरिटी कॅमेरा चालू होता. या दरम्यान जे काही झालं त्याचं चित्रिकरण झालं. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. इतक्यात हरभजन सिंग श्रीसंतजवळ आला आणि श्रीसंतला उलट्या हाताने कानशि‍लात लगावली. श्रीसंतला झालेला प्रकार काही काळ कळलाच नाही. नंतर हरभजन सिंग पुन्हा त्याच्याजवळ आला. तेव्हा दोघांच्या मध्ये इरफान पठाण आणि महेला जयवर्धने आले. हा व्हिडीओ मी 17 वर्षात कधीच शेअर केला नव्हता.’

हरभजन सिंग झालेल्या प्रकाराबाबत कायम आपली मोठी चूक असल्याचं मानत आला आहे. इतकंच काय तर आयुष्यातून कोणती गोष्ट खोडायची झाली तर ही घटना असेल असं तो वारंवार म्हणाला आहे. पण ती घटना काही त्याच्या मनातून जात नाही. आजही श्रीसंतच्या मुलीने सांगितलेली गोष्ट त्याला त्रास देत आहे. हरभजनने श्रीसंतची मुलगी काय म्हणाली ते सांगितलं होतं, ‘मी तुझ्याशी बोलू इच्छित नाही. तू माझ्या वडिलांना मारलं होते.’ या वक्तव्यानंतर हरभजनला रडू कोसळलं होतं.