
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत घसरण झाली आहे. मुंबईची आयपीएलच्या 17 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाहीय. मुंबईला 30 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा हा या हंगामातील सातवा पराभव ठरला. कॅप्टन हार्दिकला या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका लागला आहे. बीसीसीआयने हार्दिकवर मोठी कारवाई केली आहे. तसेच आता हार्दिकवर बंदीची टांगती तलवार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्या निर्धारित वेळेत 20 ओव्हरचा खेळ पूर्ण करण्यात अपयशी ठरला. हार्दिकवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली. हार्दिककडून ओव्हर रेट कायम न राखण्याची ही दुसरी वेळ ठरली. त्यामुळे हार्दिकला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकंच नाही, तर हार्दिककडून पुन्हा अशी चूक झाल्यास त्याच्यावर 1 सामन्याची बंदी घातली जाईल. त्यामुळे पंड्यावर बंदीची टांगती तलवार आहे.
कॅप्टन हार्दिकसह मुंबई इंडियन्समधील इतर 10 खेळाडूंवरही बीसीसीआयने कारवाई केली आहे. यात इमपॅक्ट खेळाडूंचाही समावेश आहे. स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने या खेळाडूंना त्यांच्या एका सामन्याच्या मानधनापैकी 25 टक्के रक्कम ही दंड म्हणून ठोठावली आहे. त्यामुळे एक चूक संपूर्ण संघाला चांगलीच महागात पडली आहे.
दरम्यान मुंबईने लखनऊसमोर विजयासाठी 145 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनऊने हे आव्हान मार्कस स्टोयनिस याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनऊचा हा मुंबई विरुद्धचा 5 सामन्यातील चौथा विजय ठरला. त्याआधी लखनऊने मुंबईला 144 धावांवर रोखलं. त्यानंतर लखनऊकडून मार्कस स्टोयनिस याने 45 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली. लखनऊने हे विजयी आव्हान 4 बॉलआधी पूर्ण केलं.
हार्दिक पंड्याला मोठा झटका
Hardik Pandya has been fined 24 Lakhs for the slow over-rate against Lucknow.
– If he gets one more slow over rate then he will be banned for one match. pic.twitter.com/eWkxp5aEXe
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि मयंक यादव.