Vijay Hazare Trophy 2022: क्रिकेटच्या मैदानातून महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी

| Updated on: Nov 30, 2022 | 6:46 PM

धोनीच्या 2 शिष्यांची महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका

Vijay Hazare Trophy 2022: क्रिकेटच्या मैदानातून महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी
Cricketer
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: सीएसकेचा स्टार ऋतुराज गायकवाड भले टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. पण त्याने आपल्या महाराष्ट्राच्या टीमला यशाच्या शिखरावर पोहोचवलय. या स्टार फलंदाजाने आधी क्वार्टर फायनलमध्ये डबल सेंच्युरी झळकवली. त्यानंतर सेमीफायनलमध्ये त्याने शतकी खेळी केली. त्या बळावर महाराष्ट्राची टीम विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. कॅप्टन गायकवाड आणि अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरची घातक गोलंदाजी या बळावर महाराष्ट्राने विजय मिळवला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आसामच्या टीमला 12 धावांनी हरवलं. महाराष्ट्राचा सामना आता फायनलमध्ये सौराष्ट्राविरुद्ध होणार आहे.

महाराष्ट्राच्या 350 धावा, पण आसामची टीम लढली

अहमदाबादमध्ये बुधवारी 30 नोव्हेंबरला दोन सेमीफायनलचे सामने झाले. पहिल्या सेमीफायनलमध्ये सौराष्ट्राने कर्नाटकवर एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने आसामवर विजय मिळवला. महाराष्ट्राने पहिली बॅटिंग केली. महाराष्ट्राने 350 धावांचा डोंगर उभा केला. आसामच्या टीमनेही चांगली लढत दिली. त्यांनी 338 धावांपर्यंत मजल मारली.

पुन्हा एकदा ऋतुराजच तुफान

महाराष्ट्राने या सामन्यात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ओपनर राहुल त्रिपाठीचा विकेट लवकर गमावला. त्यानंतर कॅप्टन गायकवाडने आपला दमदार फॉर्म कायम राखला. गायकवाडने मागच्या उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाबाद 220 धावा फटकावल्या होत्या.

गायकवाड या मॅचमध्ये 168 धावांची जबरदस्त इनिंग खेळला. त्याने 6 षटकार आणि 18 चौकार लगावले. ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या फॉर्मेटमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरी असलेला क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज आहे.

हंगरगेकरची जबरदस्त गोलंदाजी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सीएसकेकडून खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने आज जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 10 ओव्हर्समध्ये 65 धावा देऊन 4 विकेट काढल्या. त्याने सर्वात महत्त्वाचा रियान परागचा (15) विकेट काढला. त्याने या सीजनमध्ये 3 शतकं ठोकली आहेत. त्याशिवाय आसामचा कॅप्टन ओपनर कुणाल सायकियाची (10) विकेट सुद्धा त्याने काढली.

आसामकडून स्वरूपन पुर्कायस्थ आणि सिबसंकर रॉयने झुंजार खेळ केला. पण टीम विजय मिळवू शकली नाही. शुक्रवारी 2 डिसेंबरला सौराष्ट्र विरुद्ध फायनल होणार आहे.