मॅच रेफरीने कन्कशन सब्सटीट्यूट प्रकरणी आयसीसीवर केला भ्रष्टाचाराचा आरोप! भारताच्या दिग्गजाला सुनावलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका भारताने 4-1 ने खिशात घातली. मात्र या मालिकेतील चौथ्या सामन्यातील कन्कशन सब्सटीट्यूट प्रकरणाचा वाद काही शमताना दिसत नाही. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि आयसीसी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉडने गंभीर आरोप केले आहेत.

मॅच रेफरीने कन्कशन सब्सटीट्यूट प्रकरणी आयसीसीवर केला भ्रष्टाचाराचा आरोप! भारताच्या दिग्गजाला सुनावलं
Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 03, 2025 | 2:28 PM

भारत इंग्लंड मालिकेतील चौथ्या सामन्यात शिवम दुबेच्या हेल्मेटला जोरात चेंडू आदळला. नियमानुसार त्याच्या ऐवजी कन्कशन सब्सटीट्यूट म्हणून हार्षित राणाला संधी मिळाली. मात्र त्याला संधी दिल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. शिवम दुबेचा कन्कशन सब्सटीट्यूट हार्षित राणा कसा असू शकतो याबाबत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर इतर आजी माजी खेळाडूंनी त्याची री ओढली होती. मायकल वॉन आणि केविन पीटरसन यांनीही टीकास्त्र सोडलं होतं. आता आयसीसी मॅच रेफरी आणि इंग्लंडचा माजी खेळाडू ख्रिस ब्रॉड याने आयसीसीवर भ्रष्टाचार आणि पक्षपाताचा आरोप केला आहे. इतकंच काय तर नाव न घेता दिग्गज क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

ख्रिस ब्रॉड यांनी एक्सवर लिहिलं की, ‘या पद्धतीची स्थिती रोखण्यासाठी निष्पक्ष सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती सुरु झाली होती. आयसीसी पुन्हा एकदा पक्षपात आणि करप्शनच्या जुन्या पद्धतीवर का परतत आहे?’ त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणी ब्रॉडने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चौथ्या टी20 सामन्यातील रेफरी जवागल श्रीनाथ याच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडलं. ब्रॉडने श्रीनाथचं नाव न लिहिता एक क्रीडा वेबसाईटच्या ट्वीटवर लिहिलं की, ‘मी, पूर्णपणे सहमत आहे. एक भारतीय मॅच रेफरी भारतीय रिप्लेसमेंट दिल्यानंतर वाचू कसा शकतो? पक्षपात टाळण्यासाठी निष्पक्ष मॅच अधिकारी हवेत.’

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळलेल्या सामन्यात हार्षित राणा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. अष्टपैलू शिवम दुबे फलंदाजी करताना जखमी झाल्याने त्याला कन्कशन सब्सटीट्यूट म्हणून संधी मिळाली. त्याने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचे तीन विकेट घेतले. नियमानुसार, ज्या खेळाडूला कन्कशन अंतर्गत दुखापत झाली आहे त्याऐवजी तशीच क्षमता असलेला खेळाडू मैदानात उतरला पाहीजे. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी टीम इंडियाला शिवमच्या जागी हार्षित राणाला खेळण्याची संधी दिली होती.इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू श्रीनाथ आणि आयसीसीच्या निर्णयाशी सहमत नाहीत.