MI vs CSK Toss : मुंबईने टॉस जिंकला, मराठमोळ्या आयुष म्हात्रे याचं पलटणविरुद्ध पदार्पण, पाहा प्लेइंग ईलेव्हन

Ayush Mhatre Ipl Debut 2025 Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियममध्ये होणारा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील हा चौथा सामना आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

MI vs CSK Toss : मुंबईने टॉस जिंकला, मराठमोळ्या आयुष म्हात्रे याचं पलटणविरुद्ध पदार्पण, पाहा प्लेइंग ईलेव्हन
mi vs csk toss ipl 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 20, 2025 | 7:35 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हायव्होल्टेज सामन्यात आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईने 23 मार्चला मुंबईवर मात केली होती. त्यामुळे पलटणकडे आज (20 एप्रिल) या सामन्यात यलो आर्मीला घरच्या मैदानात चितपट करुन गेल्या पराभवाची वसूली करण्याची संधी आहे. उभयसंघामधील या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

आयुष म्हात्रेचं आयपीएल पदार्पण

मुंबईने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईने एकमेव बदल केला आहे. चेन्नईने लोकल बॉय असलेल्या 17 वर्षीय आयुष म्हात्रे याला पदार्पणाची संधी दिली आहे. आयुषचा दुखापतीमुळे बाहेर झालेल्या ऋतुराज गायकवाड याच्या जागी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आयुष आता पदार्पणात आणि घरच्या मैदानात कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई-चेन्नई यांच्यापैकी सरस कोण?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 38 सामने झाले आहेत. मुंबईने चेन्नईच्या तुलनेत 2 सामने जास्त जिंकले आहेत. मुंबईने चेन्नईवर 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर यलो आर्मीने पलटणला 18 वेळा पराभवाची धुळ चारली आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये कोण वरचढ?

मुंबई विरुद्ध चेन्नई या दोन्ही संघात आयपीएलमध्ये एकूण 12 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईचा घरच्या मैदानातही दबदबा राहिला आहे. मात्र चेन्नईने गेल्या 2 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. मुंबईने वानखेडेत 7 तर चेन्नईने 5 सामने जिंकले आहेत.

आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ

मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र या 18 व्या मोसमात दोन्ही संघांना काही खास करता आलेलं नाही. दोन्ही संघ आपला दबदबा कायम राखण्यात अपयशी ठरले आहेत. दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत प्रत्येकी 7-7 सामने खेळले आहेत. मुंबईने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला फक्त 2 वेळाच जिंकता आलं आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या तर चेन्नई दहाव्या स्थानी आहे.

आयुष म्हात्रेचं वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), नूर अहमद, खलील अहमद आणि मथीशा पाथिराना.