
आशिया कप स्पर्धा संपली तरी वाद काही केल्या संपत नाही. आता ट्रॉफी प्रकरण चांगलंच गाजत आहेत. मोहसिन नकवीने भारताने जिंकलेली ट्रॉफी स्वत:जवळ ठेवली. आता हा वाद दुबई पोलिसांपर्यंत पोहोचणार असल्याची चर्चा रंगली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय या प्रकरणी मोहसिन नकवीविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. नकवीविरुद्ध ट्रॉफी चोरी आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याबद्दल तक्रार दाखल केली जाऊ शकते, असे वृत्त आहे. एसीसी अधिकाऱ्यांकडे ट्रॉफी देण्याऐवजी नकवी ती ट्रॉफी सोबत हॉटेलमध्ये घेऊन गेले. मोहसिन नकवी यांच्यावर दुबईमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. दुबईमध्ये चोरीसाठी खूप कठोर शिक्षा आहे. मोहसिन नकवी यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास दंडाव्यतिरिक्त गुन्हेगाराला 5 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. काही गंभीर चोरीच्या प्रकरणांमध्ये 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेत नकवी यांच्यावर महाभियोग चालवण्याचा इशारा दिला आहे. नकवी यांनी त्यांची कर्तव्य योग्यरित्या पार पाडली नाहीत असा ठपका ठेवला आहे. इतकंच काय तर ट्रॉफी सोबत नेण्याचा अधिकार नसल्याचं देखील सांगितलं. महाभियोगाची प्रक्रिया केल्यास एसीसी सदस्यांच्या भारताच्या बाजूने मतदान केलं तर नकवी यांना राजीनामना द्यावा लागेल. पण महाभियोग सुरु करायचा की नाही याबाबत काही स्पष्टता नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नकवी यांना ट्रॉफी घेऊन पाकिस्तानला जाण्यापासून रोखण्यासाठी बीसीसीआय यूएई अधिकाऱ्यांशी सतत चर्चा करत आहे. दुसरीकडे, मोहसिन नकवीने ट्रॉफी दुबई क्रिकेट बोर्डाकडे सोपवून पळ काढल्याची देखील चर्चा आहे. मोहसिन नकवी यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची माफी मागितल्याचेही माध्यमांमध्ये वृत्त आले होते. पण मोहसिन नकवी यांनी त्याचं खंडन केलं आहे. 28 सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कप फायनलनंतर भारतीय संघाने नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफीशिवाय अंतिम विजय साजरा केला. 29 सप्टेंबर रोजी टीम इंडिया ट्रॉफीशिवाय भारतात आली.