
आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. जगातील महागड्या लीग पैकी एक लीग म्हणून आयपीएलचा गौरव आहे. त्यामुळे या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. खासकरून सामना मैदानात उपस्थित राहून पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. होम ग्राउंडवरील सामन्याच्या तिकिट बुकिंग वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्सचा होम ग्राउंडवरील अर्थात वानखेडे मैदानावरील पहिला सामना हा 31 मार्चला होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध असणार आहे. घरच्या मैदानावरून प्रत्यक्ष सामना पाहण्याची वेगळीच मजा आहे. त्यामुळे चाहत्यांना हा आनंद घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने तिकीट घेण्याची वेळ ठरवली आहे. ही तिकीट विक्री तीन टप्प्यात करण्यात येणार आहे.
तिकीट विक्रीचा पहिला टप्पा 3 मार्चला दुपारी 4 वाजल्यापासून सुरु होईल. गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्य तिकीटं बूक करू शकतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 4 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिकीट विक्री होईल. यावेळी ब्लू सदस्यांना तिकीट दिली जातील. शेवटचा टप्पा 6 मार्चला सुरु होणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिकीटं सर्वांसाठी उपलब्ध असतील. ही तिकीट फक्त बूक माय शो या अधिकृत आयपीएल पार्टनर प्लॅटफॉर्मवरूनच बूक करता येतील.
मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला होता. तसेच सर्वात शेवटच्या स्थानावर राहात निराशा केली होती. आता मुंबई इंडियन्स मागचं सर्वकाही विसरून नव्याने सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. मुंबई इंडियन्सचा या पर्वात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सशी 23 मार्चला होणार आहे.
🚨 UPDATE ON IPL TICKETS FOR THE HOME GAMES OF MUMBAI INDIANS 🚨 pic.twitter.com/lCbFZKhG5j
— Johns. (@CricCrazyJohns) February 27, 2025
आयपीएल 2025 मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंगे (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), श्रीजित कृष्णन (यष्टीरक्षक), बेवन-जॉन जेकब्स, नमन धीर, तिलक वर्मा. संघातील अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा आणि विघ्नेश पुत्तूर यांचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, रीस टॅपली, अश्वनी कुमार, कर्ण शर्मा, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर आणि लिजाद विल्यम्स.