
ट्रेव्हिस हेड, प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोक्यात गेलेलं नाव. याच ट्रेव्हिस हेडने आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध निर्णायक कामगिरी करत वर्ल्ड कप हिसकावला होता. हेडने रोहित शर्माचा उलट दिशेने घेतलेला कॅच आणि त्यानंतर केलेली फटकेबाजी भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरु शकणार नाही. त्यानंतर हा ट्रेव्हिस हेड मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या डोक्यात गेला आहे. हेडने आयपीएलच्या 17 व्या मोसमात झंझावाती खेळी केलीय. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना हेडने मुंबई इंडियन्स विरुद्ध वादळी खेळी केली. मुंबईच्या टीम डेव्हिडच्या एका चुकीचा हेडने पूरेपूर फायदा घेतला.
हेडला लवकर आऊट करण्याची सुवर्णसंधी मुंबईला होती. मात्र मुंबईला टीम डेव्हिडची एक चूक तब्बल 57 धावांनी महागात पडली. टीम डेव्हिडने हैदराबादच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेडचा कॅच सोडला. हार्दिकने टाकलेल्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेडला कॅच आऊट करण्याची संधी चालून आली होती. मात्र ही संधी डेव्हिडने गमावली. कॅच फार सोपी नव्हती. मात्र हेडसारख्या घातक फलंदाजाची कॅच घेणं अपेक्षित होतं. मात्र टीमने हेडची 5 धावांवर असताना ही घोडचूक केली.
हेडने या जीवनदानाचा भरपूर फायदा घेतला. हेडने त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. हेडने झंझावाती खेळी करत पावरप्लेचा फायदा घेतला. हेडने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. हेडने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर हेडने 13 धावा जोडल्या. मात्र अखेर हेड 62 धावांवर आऊट झाला. मात्र तोवर उशीर झाला होता. गेराल्ड कोएत्झी याने नमन धीर याच्या हाती हेडला कॅच आऊट केलं. हेडने 24 बॉलमध्ये 258.33 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 9 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. आता डेव्हिडने कॅच सोडली की मॅच सोडली हे लवकरच समजेल.
हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.
मुंबई प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि क्वेना माफाका.