रोहितच्या नेतृत्वात टीमचा सलग तिसरा पराभव, 31 धावांनी सामना गमावला

टॉप अँड टी20 मालिकेत नेपाळ संघाला आणखी एक पराभवाचा धक्का सहन करावा लागाला आहे. मेलबर्न स्टार्सने नेपाळचा 31 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे नेपाळ संघाला मोठा धक्का बसला आहे.

रोहितच्या नेतृत्वात टीमचा सलग तिसरा पराभव, 31 धावांनी सामना गमावला
रोहितच्या नेतृत्वात टीमचा सलग तिसरा पराभव, 31 धावांनी सामना गमावला
Image Credit source: Nepal Cricket Facebook
| Updated on: Aug 18, 2025 | 6:18 PM

टॉप अँड टी20 मालिका 2025 स्पर्धेत नेपाळ संघावर आणखी एका पराभवाची नामुष्की ओढावली आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु आहे. या स्पर्धेतील 13व्या सामन्यात मेलबर्न स्टार्स अकादमी आणि नेपाळ हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मेलबर्न स्टार्स अकादमीच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. मेलबर्न स्टार्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 7 विकेट गमवून 144 धावांपर्यंत मजल मारू शकला. मेलबर्न स्टार्स अकादमीने नेपाळचा 31 धावांनी पराभव केला. बांगलादेश अ आणि नॉर्दर्न टेरिटरी स्ट्राईकविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या पराभवानंतर हा तिसरा पराभव ठरला. दरम्यान, आशिया कप 2025 स्पर्धेसाठी नेपाळचा संघ पात्र ठरलेला नाही. ही स्पर्धा युएईत पुढच्या महिन्यात होणार आहे.

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलच्या नेतृत्वात क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या संघाने पहिल्या षटकातच मेलबर्नला धक्का दिला. अवघ्या 2 धावा असताना पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट गेली. मात्र त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी खूपच घाम गाळावा लागला. कारण दुसऱ्या विकेटसाठी थॉमस रॉजर आणि ब्लेक मॅकडॉनल्ड्स यांनी 120 धावांची भागीदारी केली. त्यामुळे नेपाळचा संघ बॅकफूटवर गेला. 14व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही जोडी फोडण्यात लामिछानेला यश आलं. दुसरीकडे, कर्णधार रोहित पौडेल पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने 4 षटकं टाकत 27 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही.

नेपाळकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख ही जोडी मैदानात उतरली. 25 धावांवर असताना कुशल यष्टीचीत झाला. तर आसिफ शेख 53 धावांवर असताना धावचीत झाला. या शिवाय रोहित पौडेलने 33 धाावंची खेळी केली. तर इतर फलंदाज एकेरी धावांवर तंबूत परतले. भीम शार्की 1, कुशल मल्ला 11, दीपेंद्र सिंह अरी 1, गुलशन झा 2 धावा करून बाद झाले. तर आरिफ शेख 8 धावा करून नाबाद राहिला.