
न्यूझीलंडने विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममधील चौथ्या टी 20I सामन्यात यजमान टीम इंडियासमोर 216 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामी जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत पोहचता आलं. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया 216 धावांचा यशस्वी पाठलाग करत सलग चौथा विजय साकारणार की न्यूझीलंड जिंकणार? हे थोड्याच वेळात निकालानंतर स्पष्ट होईल.
भारताने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडच्या सलामी जोडीने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी चौफेर फटकेबाजी करुन शतकी भागीदारी केली. या दोघांमुळे न्यूझीलंडला कडक सुरुवात मिळाली. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती. अशात कुलदीपने डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट करत ही सेट जोडी फोडली. कॉनव्हने 44 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला
टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिला झटका दिल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. भारताने इथून न्यूझीलंडला ठराविक अंतराने झटके दिले. भारताने अशाप्रकारे न्यूझीलंडच्या काही फंलदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. मात्र त्यानंतरही न्यूझीलंड 215 धावांपर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरली.
न्यूझीलंडसाठी टीम सायफर्ट याने सर्वाधिक 62 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स याने 24 धावांचं योगदान दिलं. मिचेल सँटनर याने 11 आणि झॅकरी फॉल्क्स याने 13 धावा केल्या. तर डॅरेल मिचेल याने 18 चेंडूत नाबाद 39 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियासाठी अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंडचा नागपूर, रायपूर आणि त्यानंतर गुवाहाटीत धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवलीय. तसेच टीम इंडियाने टी 20i मध्ये आतापर्यंत 209 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग चौथा विजय मिळवायचा असेल तर इतिहास बदलावा लागणार आहे. अशात टीम इंडिया यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून असणार आहे.