
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याला बांग्लादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतून सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटीसाठी 29 ऑगस्ट रोजी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली. हा सामना 30 ऑगस्टपासून रावळपिंडी स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अबरार अहमद आणि मीर हमजा या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 28 ऑगस्ट रोजी दुसऱ्या कसोटीसाठी सुधारित संघ जाहीर केला होता. त्यामध्ये अबरार अहमद आणि कामरान गुलाम या दोघांचा समावेश होता. मात्र दोघांपैकी अबरार याला 12 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे. आता अबरारला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दुसर्या बाजूला शाहीन आफ्रिदीला संधी न मिळाल्याने चर्चांना उधाण आलंय. त्याला संधी का मिळाली नाही? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. याबाबत पाकिस्तानचे बॉलिंग कोच जेसन गिलिस्पी यांनी पत्रकार परिषदेत आफ्रिदीला संधी न देण्याचं कारण सांगितलं आहे. गिलिस्पीने यासह निवड प्रक्रियेबाबतही माहिती दिली.
“आम्ही अबरारचा 12 खेळाडूंमध्ये समावेश केला आहे. आता आम्हाला खेळपट्टी पाहायची आहे. आम्ही उद्या सकाळी खेळपट्टीचा आढावा घेऊ. शाहीनला या सामन्यात संधी दिलेली नाही. माझं शाहीनसोबत बोलणं झालं. तो सर्वकाही समजतो. मी आनंदी आहे की त्याला परिस्थितीबाबत माहित आहे. आमचा सर्वोत्तम 11 खेळाडू निवडण्याकडे कळ आहे. आम्ही परिस्थिती पाहूनच कोणत्या गोलंदाजांना संधी द्यायची हे ठरवू”, असं गिलिस्पीने म्हटलं.
“शाहीनला आम्ही अभिप्राय (फीडबॅक) दिला आहे. शाहीनसाठी गेले काही आठवडे शानदार असे राहिले आहेत. तो बाप झालाय. शाहिनने अशावेळेस कुटुंबासह रहायला हवं. शाहीन त्याच्या बॉलिंगवर मेहनत घेतोय. आम्हाला शाहीनला शानदार कामगिरी करताना पाहायचंय. शाहीनला तिन्ही फॉर्मेटमध्ये खूप खेळायचं आहे. शाहीन येत्या काळात आमच्यासाठी निर्णायक भूमिका बजावेल. शाहीन चांगला खेळाडू आणि चांगला माणूसही आहे”, असंही गिलेस्पीने म्हटलं.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची टीम : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयूब, बाबर आझम, सऊद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, अबरार अहमद, नसीम शाह आणि मीर हमजा.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा, खालेद अहमद, नईम हसन, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम.