
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात असा प्रकार घडला ज्यामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला. पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक याला दुखापत झाली. इमामच्या जबड्यावर धाव घेताना बॉलचा जोरात फटका बसला. न्यूझीलंडच्या खेळाडूने थ्रो केला. हा बॉल इमामच्या थेट हेल्मेटमध्ये शिरला आणि त्याच्या जबड्यावर आदळला. त्यामुळे इमामच्या जबड्याला दुखापत झाली. इमाम धावता धावता मैदानात कोसळला. इमामला इतका त्रास झाला की त्याला अॅम्ब्यूलन्सने मैदानाबाहेर नेण्यात आलं. हा सर्व प्रकार पाहून क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
पाकिस्तानच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. इमामने विलियम ओरुर्केच्या बॉलिंगवर ऑफ साईडला फटका मारुन सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यूझीलंडच्या फिल्डरने नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने थ्रो केला. मात्र बॉल इमामच्या हेल्मेटमध्ये शिरला. त्यामुळे इमाम मैदानात कोसळला. इमाम मैदानात कोसळताच पाकिस्तानचे फिजिओ धावत आले. इमामला पाहून दुखापत गंभीर स्वरुपाची आहे, असं प्रथमदर्शनी वाटलं नाही. मात्र तपासणीनंतर इमामला मेडीकल टीमने अॅम्ब्यूलन्सने (Ambulance Buggy) मैदानाबाहेर नेलं. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला.
इमामला बाहेर जावं लागल्याने कनकशन सब्सटीट्यूट म्हणून उस्मान खान याला संधी देण्यात आली. नियमानुसार, फलंदाजाला दुखापत झाली तर फलंदाजालाच कनकशन सब्सटीट्यूट म्हणून संधी दिली जाते. इमामप्रमाणे उस्मान खान हा देखील फलंदाज आहे. उस्मान खान याला या संधीचा फार फायदा करुन घेता आला नाही. उस्मानने 17 बॉलमध्ये 12 धावा केल्या.
दरम्यान तिसर्या सामन्यात पावसाने खोडा घातल्याने 8 ओव्हर कमी करण्यात आल्या. त्यामुळे 42 षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडने पाकिस्तानला 40 ओव्हरमध्येच 221 धावांवर गुंडाळलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे पाकिस्तानला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं.
इमामच्या जबड्यावर बॉलचा फटका
Imam ul Haq retired hurt#PAKvNZ #PakistanCricket #Cricket pic.twitter.com/ulUYUzrPtx
— Urooj Jawed🇵🇰 (@uroojjawed12) April 5, 2025
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन: रिस मार्यू, निक केली, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टीम सायफर्ट, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मुहम्मद अब्बास, मिशेल हे (विकेटकीपर), जेकब डफी, बेन सियर्स आणि विल्यम ओरोर्क.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), सलमान आघा, तैयब ताहिर, फहीम अशरफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सुफियान मुकीम आणि अकिफ जावेद.