पाकिस्तानने टी20 संघाची घोषणा करताच चेन्नई सुपर किंग्सची धाकधूक वाढली, तसं झालं तर…

आयपीएल स्पर्धा ऐन रंगात आली असताना पाकिस्तानच्या कुरापती सुरु झाल्याचं दिसत आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान पाकिस्ताननं टी20 मालिकेचं आयोजन केलं आहे. न्यूझीलंडचा संघ या मालिकेसाठी पाकिस्तानात जाणार आहे. पण यामुळे चेन्नई सुपर किंग्सची धाकधूक वाढली आहे. कारण पाकिस्तानने संघ जाहीर केला असून आता न्यूझीलंडची पाळी आहे.

पाकिस्तानने टी20 संघाची घोषणा करताच चेन्नई सुपर किंग्सची धाकधूक वाढली, तसं झालं तर...
| Updated on: Apr 09, 2024 | 5:15 PM

आयपीएल स्पर्धा सुरु असताना 18 एप्रिलपासून पाकिस्तान न्यूझीलंड मालिकेला सुरुवात होणार आहे.पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यीय संघाची कमान बाबर आझमच्या हाती सोपवली आहे. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझमला पुन्हा संधी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका टी20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानी संघाचा कॅम्प अबोटाबादमधील काकुल येथे लागला होता. दोन आठवडे पाकिस्तानी खेळाडूंनी आर्मीसोबत फिटनेस आणि टीम बाँडिंगवर काम केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी हेड कोच म्हमून अझहर महमूदच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत न्यूझीलंडचे 8 खेळाडू खेळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यासाठी आयपीएल मध्यातच सोडली तर फ्रेंचायसीचं नुकसान होईल. त्यामुळे न्यूझीलंडला एकतर दुसरा संघ पाकिस्तानला पाठवावा लागेल. तसं नसेल तर 8 खेळाडूंना मध्यातच आयपीएल सोडून संघासाठी खेळावं लागेल.

न्यूझीलंडचे सर्वाधिक खेळाडू हे चेन्नई सुपर किंग्स संघात आहेत. यात डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर यांचा चेन्नईचा संघात समावेश आहे. रचिन रवींद्रने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली आहे. तसेच गोलंदाजीतही कमाल करत आहे. तर केन विल्यमसन गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील अनुभवी फलंदाज आहे. लॉकि फर्ग्युसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत आहे. ट्रेंट बोल्ट राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचा कणा आहे. ग्लेन फिलिप्स सनरायझर्स हैदराबाद या संघात आहेत.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना 18 एप्रिल, दुसरा टी20 सामना 20 एप्रिल, तिसरा टी20 सामना 21 एप्रिलला, चौथा टी20 सामना 25 एप्रिल आणि पाचवा टी20 सामना 27 एप्रिलला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने संध्याकाळी 7 वाजता असणार आहेत.

न्यूझीलंड मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), शाहीन शाह अफरीदी, मोहम्मद रिजवान, अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी. मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सायम अय़ूब, शादाब खान, उसामा मीर, उस्मान खान, जमान खान.